रहिवाशांचे ग्रामपंचायतीला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हडलगेत लमाणवाडा येथील रहिवाशांना रहदारीसाठी पक्का रस्ता नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी रस्ता न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे. या संदर्भातील निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, हडलगे येथील लमाणवाडा येथे गेली तीन पिढ्यापासून रहिवासी आहोत. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी अद्यापपर्यंत पक्का रस्ता नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात तर कच्च्या रस्त्यावर ओढ्याचे स्वरूप तयार होते. गेली कित्येक वर्ष झाली येथील ग्रामस्थांना रस्त्याचीच सोय झालेली नाही. ऐनवेळी कोणतीतरी दुर्घटना घडल्यास लमाणवाडापर्यंत रुग्णवाहिका देखील येणे अशक्य आहे. या समस्येकडे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर पथदिव्यांवर दिव्यांची, स्वच्छ पाण्याची व स्वतंत्र अंगणवाडीची सोय नाही. या सर्व समस्यांची सोडवणूक होत नाही त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर पुंडलिक लमाण, पांडुरंग लमाण, रवींद्र लमाण, रत्नाबाई लामाण, सुरेश लमाण, प्रकाश लमाण, राजू लमाण, मंगेश लमाण, बाळू लमाण, मीरा लमाण, हरीबा लमाण, रवींद्र लमाण आदींच्या सह्या आहेत.


