गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भडगाव येथील पूरस्थितीची उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने व तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी भडगाव गावाला भेट देत पाहणी केली.
हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सलग पाचव्या दिवशी हे पूल पाण्याखालीच आहे. नदीची पाणी पातळी बाहेर पडल्याने भडगावच्या नदीकाठावरील घरांमध्ये तसेच दुकाने व गोठ्यामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर येथील पूरस्थितीची पाहणी उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केली. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांविषयी माहिती घेत त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे की नाही याची माहिती स्थानिक यंत्रणेकडून घेतली. काही नागरिक आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाल्याचे तसेच दोन कुटुंबाला शाळेत राहण्याची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी तलाठी सौ रुपाली कांबळे, पोलीस पाटील उदय पुजारी, स्थानिक आपत्ती व्यवस्थापनचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन टीम व महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक
भडगाव येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीमने पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सतर्क राहत नागरिकांना मदत व सहकार्य करत असल्याबद्दल तसेच पुराच्या पाण्यातून जात विद्युत पुरवठ्याबाबतची खबरदारी घेतल्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने व तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी कौतुक करत समाधान व्यक्त करत केले.
घरगुती गॅस सिलिंडरची उपलब्धता करण्याची सूचना
भडगाव पुलावर पुराचे पाणी असल्याने या ठिकाणची वाहतूक बंद आहे. त्यामुळे भडगाव येथील ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होऊन गैरसोय होऊ नये यासाठी गावात घरगुती गॅस सिलिंडर शिल्लक ठेवण्यात यावेत, याकडे ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे लक्ष वेधले. यावर तातडीने तहसीलदारांनी संबंधितांना सूचना देत गावात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

