"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी महिलांची धावपळ
![]() |
गडहिंग्लज : छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या तलाठी कार्यालयासमोर महिलांची झालेली गर्दी. (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार ) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील तलाठी कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. गडहिंग्लज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या तलाठी कार्यालयासमोर भली मोठी रांग लागली होती.
राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्प वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केला. या अर्थसंकल्पात 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी "मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना" जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी राजभर नोंदणीचे काम सुरू झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये अशी अट आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचा दाखला तसेच इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालयांसह आपले सरकार केंद्र या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.
भडगाव येथील तलाठी कार्यालयातही गर्दी
भडगावातही "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' योजनेसाठी लागणारी विविध कागदपत्रे काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि आपले सरकार केंद्र या ठिकाणी महिलांची गर्दी दिसून आली.




