शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले पालिका मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष
कार्यक्रमांसाठी हॉल कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्याची केली मागणी
महिन्याभरात कार्यवाही करण्याचे मुख्याधिकारी यांनी दिले आश्वासन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील डॉ. आंबेडकर हॉलची दुरुस्ती करून विविध सोयी-सुविधा द्याव्यात व हा हॉल कायमस्वरूप कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली. शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, येत्या महिन्याभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
गडहिंग्लज शहरातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेला माफक दरात विविध कार्यक्रम घेण्यासाठी डॉ. आंबेडकर हॉल हे मध्यवर्ती ठिकाणी सोयीचे आहे. सर्व समाजाचे कार्यक्रम या हॉलमध्ये पार पडतात. मात्र या ठिकाणी काही सोयी नसल्याने गैरसोयीला तोंड द्यावे लागते. कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी मंडप मारावे लागते या ऐवजी येथे कायमस्वरूपी पत्र्याचा शेड उभा करण्यात यावा, स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कामगाराची नेमणूक करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्यावेळी वॉचमनची नेमणूक करावी, गाड्या पार्किंगसाठी पट्टे मारण्यात यावेत, पाण्याच्या टाकीला गळती असल्याने नवीन टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी, रहिवाशी वस्तीत हा हॉल असल्याने रात्री १० नंतर याठिकाणी कोणतेही वाद्य वाजविण्यास मनाई करावी, या हॉलमधील कार्यक्रमामुळे येथील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. आदी बाबींकडे मुख्याधिकाऱ्यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
यावेळी शहर प्रमुख संतोष चिकोडे, माजी तालुकाप्रमुख विलास यमाटे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, भरत जाधव, महादेव पाटील, विभागप्रमुख राजू रामजी, आनंद माने, उपशहर प्रमुख संदीप कुराडे, सुनील डवरी, विशाल चांदेकर, मनीष हावळ, रवींद्र पाटील, शाखाप्रमुख केदार डांग, उपशहर प्रमुख श्रीशैलाप्पा साखरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


