गुरुवर्य मा.ना .कुलकर्णी (बापू) यांच्या चरित्रावर आधारित लेखक दिनकर खवरे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुंडगे येथे पार पडला कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजच्या पूर्व भागात दिनकर खवरे यांच्यासारखा लेखक, कवी, सूत्रसंचालक निर्माण होणे ही गडहिंग्लज तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. दोन वर्षात चार पुस्तके लिहून एका प्राथमिक शिक्षकाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संकटकाळी धावून येणारे आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी काढले.
आज थोर शिक्षणतपस्वी, गांधीवादी विचारांचे प्रणेते ,स्वातंत्र्यसैनिक व दुंडगे (ता. गडहिंग्लज) गावचे सुपुत्र गुरुवर्य मा.ना .कुलकर्णी (बापू) यांच्या चरित्रावर आधारित लेखक दिनकर खवरे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख व साहित्यिक मधुकर येसने तर प्रमुख अतिथी म्हणून महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, जवाहर घुगरे, प्रसिद्ध युवा उद्योजक आनंदा चोथे व चंदगड पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. मनीषा अनिल शिवणगेकर उपस्थित होत्या.
व्यासपीठावर तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल बागडी ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव तराळ ,शिक्षक भारतीचे अध्यक्ष बसवराज अंकली ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य नेते श्रीनाथ पाटील ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य,नेते सतीश तेली,शिक्षक नेते संजय चाळक सर,महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश हुली, महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघटनेचे राज्यनेते तानाजी पावले व प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे विद्यमान संचालक नंदकुमार वाईंगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात स्वागत व प्रास्ताविक दादासो पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरील गुरुवर्य मा.ना कुलकर्णी व सुशीला कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गुरुवर्य मा.ना कुलकर्णी यांच्या चरित्रावर आधारित दिनकर खवरे लिखित पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल बागडी, भीमराव तराळ, हेब्बाळ केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष बिल्ले यांनी लेखक दिनकर खवरे म्हणजे संकटकाळी धावून येणारे आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व होय. शिवाय कोणत्याही कामात वक्तशीरपणा ते पाळतात. बसवराज अंकली ,श्रीनाथ पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संजय चाळक यांनी लेखन कौशल्याबद्दल सूत्रसंचालनाबद्दल तसेच त्यांनी जमवलेल्या मित्र परिवाराबद्दल गौरवोद्गार काढले. सुरेश हुली म्हणाले, गांधीवादी विचारांचा वारसा जो कुलकर्णी सरांनी जपला होता ते त्यांचे कार्य समाजाकडे पोहोचवण्याचे कार्य दिनकर खवरे करत आहेत. लेखकाचे वर्गमित्र अनिल शिवनगेकर यांनी डीएडच्या शिक्षणापासूनचा लेखकाचा प्रवास, पाठीशी असलेली गरिबी ,पण वर्गातील मित्राचे असलेले नाते याबद्दल सांगितले. कन्या विद्या मंदिर उत्तुरचे मुख्याध्यापक संतोष गिरो यांनी दिनकर खवरे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल लेखनाबद्दल तसेच त्यांच्या इंग्रजी विषयावर असलेल्या प्रभुत्वाबद्दल सांगितले तसेच गरजू व्यक्तींना मदत करताना त्यांची असलेली भावना सुद्धा सांगितली.
तानाजी पावले यांनी आपल्या मनोगतात दिनकर खवरे यांच्या कथा, कविता वाचताना शब्दांची सहज सोपी भाषा खूपच आपुलकीची वाटते, कथा कविता लिहिणे खूपच सोपे असते पण चरित्रात्मक ग्रंथ लिहिताना शब्दांची गुंफण योग्य पद्धतीनेच करावी लागते शिवाय फक्त सत्यच मांडावे लागते असे सांगितले. नंदकुमार वाईंगडे यांनी लेखन असो किंवा कोणतेही शैक्षणिक कार्य, सतत कार्यात मग्न राहून आपल्या सेवेची प्रामाणिक राहणारे व्यक्तिमत्व व मैत्रीमध्ये प्रत्येक व्यक्ती सोबत वेगळ्या प्रकारचे नाते निर्माण करण्याचे कौशल्य दिनकरला आहेअसे सांगितले. रमेश रिंगणे यांनी आपल्या मनोगतात दिनकर खवरे यांच्या लेखनप्रवासाबद्दल, सुत्रसंचलनाबद्दल, सामाजिक कार्याबद्द्ल व आजपर्यंतच्या सर्व कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. दोन वर्षात चार पुस्तके काढून एका प्राथमिक शिक्षकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिवाय गडहिंग्लजचा पूर्व भाग हा कानडी भाग म्हणून ओळखला जातो अशा या भागामध्ये असे लेखक निर्माण होणे म्हणजे गावासाठी भूषणच आहे, लेखन करतानाची चिकाटी व जिद्द तर खूपच चांगले आहे. ते साहित्य निर्माण करताना आपल्याजवळ शब्दसंपत्ती असावी लागते आणि ती शब्द संपत्ती योग्य पद्धतीने आपल्या कथा किंवा कवितातून मांडावी लागते. साहित्य म्हणजे आपल्या मनातील विचार कागदावर उतरवणे होय आणि ही कला दिनकर खवरे यांनी आत्मसात केली आहे. शिवाय गेली अनेक दिवस दररोज पहाटे स्वतः सुविचार तयार करून सर्वांना पाठवण्याचा त्यांचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर येसणे यांनी काढले.
यावेळी संयोजकांच्याकडून व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते लेखक दिनकर खवरे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दिनकर खवरे यांनी सांगितले की, माझ्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कोकणात झाली त्यामुळे साहित्याचा वारसा मिळाला आणि लेखनाला प्रोत्साहन देणारे माझे सर्व गुरुवर्यामुळेच हे साध्य झाले. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे व कोणत्याही कामात कंटाळा नसल्याने व आपल्या सर्वांच्या प्रेरणांनी आणि आशीर्वादाने हे कार्य मी करू शकलो अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. शेवटी आभार महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे सरचिटणीस राजू नाईक यांनी मानले. यावेळी सूत्रसंचालक अय्याज बागवान व परिश्रम विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक बी.जे.मोकाशी यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्याचे नियोजन परिश्रम विद्यालय दुंडगेचा संपूर्ण स्टाफ, श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ (ट्रस्ट) दुंडगे व सनी वाचनालय दुंडगे यांच्यामार्फत करण्यात आले.
यावेळी ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड. संजय देसाई,तमान्ना पाटील,सुरेश गुलगुंजी, गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. रमेश पाटील, उदय तेलवेकर, सचिन ओहरा,अक्षय हिरेमठ, हणमंत पाटील, आप्पासाहेब खवरे यांनी परिश्रम घेतले.











