एकरी 48 क्विंटल भातपिकाचे घेतले उत्पादन
अत्यंत सुमार जमिनीची मशागत करत पिकासाठी सेंद्रिय खताचा वापर
"अमोघ" जातीची वापरली बियाणे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत येणेचवंडी येथील प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच संभाजी केदारी कुराडे यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
गेल्या 2023 च्या खरीप हंगामातील गडहिंग्लज तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत प्रगतशील शेतकरी संभाजी कुराडे यांनी रोप लागण पद्धतीने गुंठ्यामागे 120 किलो याप्रमाणे एकूण 40 गुंठ्यात 4800 किलो म्हणजे एकरी 48 क्विंटल इतके भातपिकाचे उत्पन्न घेतले. यासाठी त्यांनी "अमोघ" या जातीचे बियाणे वापरले. त्यांनी अत्यंत सुमार जमिनीची मशागत आंतर- मशागतीच्या व सेंद्रीय खतांची जादा मात्रा या जोरावर जे उत्पन्न घेतले. त्यांनी शेतीत केलेल्या या प्रयोगाबद्दल शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.
संभाजी कुराडे यांना लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. येणेचवंडी लघुपाटबंधा-या शेजारी नौकुडकडील बाजूस त्यांची शेती आहे. संपूर्ण कोरडवाहू जमिनीचे सपाटीकरण व वाफे तयार करून त्यांनी भातशेती तयार केली आहे. बोअरवेल व पाटबंधा-यातील पाणी वापराचे उत्तम नियोजन, कीटकनाशकांचा योग्य वापर आणि परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड यामुळेच आपण उत्पादन वाढवू शकलो असे त्यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषीअधिकारी- सौ. रंजना देशमुख, कृषी पर्यवेक्षक अरूण खोत, कृषी सहाय्यक सौ.सुरेखा शिंदे यांचे सहकार्य लाभले. जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक यांचे ते जिवाभावाचे सहकारी आहेत.

