वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधत साजरा केला रक्षाबंधन
आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून होतंय कौतुक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बहीण- भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन या रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून दिले जाते. याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्याला रात्रीच्या अंधारात अखंडितपणे 'प्रकाश' देत सर्वांचे रक्षण करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधत गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. शिवाजी विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील ओंकार कॉलेजचे प्रा. गजानन कुलकर्णी, महागावच्या माजी सरपंच सौ. जे. पी. पताडे उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी या कर्मचाऱ्यांना राख्या बांधत त्यांचा सन्मान केला. यामुळे वीज वितरणचे कर्मचारी देखील भारावून गेले. रक्षाबंधना दिवशी वीज कर्मचाऱ्यांची आठवण करून विद्यार्थिनीनी राख्या बांधल्याने आमचाही आनंद द्विगुणीत झाला असून दुर्लक्षित आम्हा कर्मचाऱ्यांना यामुळे काम करण्यास आणखी ऊर्जा मिळाल्याचे मनोगत वीज तंत्रज्ञ गणेश काळगे, दयानंद पताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. गजानन कुलकर्णी यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संजय केसरकर यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास वीज कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार डी. व्ही. सुतार यांनी मानले.












