गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील रहदारी झाली ठप्प
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्याने भडगाव पुलावर आज दुपारी पाणी आले. त्यामुळे चार दिवसानंतर पुन्हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील रहदारी थांबली आहे.
पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान पुलाच्या स्लॅबमधील पाईपांमधून रस्त्यावर पाणी येण्यास सुरुवात झाले. त्यानंतर हळूहळू पाणी वाढत गेले. दुपारी तीनच्या दरम्यान पाणी जास्तच वाढल्याने खबरदारी म्हणून दुपारी साडेतीनच्या दरम्यान पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनची टीम व पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून या ठिकाणी त्यांनी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. चार दिवसांपूर्वीच पुराचे पाणी ओसरल्याने तब्बल सात दिवसानंतर पूल वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र आज दुपारी पुलावर पुन्हा पाणी आल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यंदाच्या पावसात सलग तिसऱ्यांदा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी वर्गाला वारंवार पुरामुळे होणाऱ्या वाहतूक बंदचा त्रास सोसावा लागत आहे.



