गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील श्री शिवाजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. बी. केसरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कलाशिक्षक धनाजी सुतार उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे धनाजी सुतार यांनी थोर व्यक्तींचा परिचय करून दिला. कुमार आदय अरभावी व कुमारी उत्कर्षा पोटे यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक एस बी केसरकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी थोर क्रांतीकारकांनी दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे असे सांगून लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृती निश्चितच आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत असे सांगितले.
सदर कार्यक्रम इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक आर. आर. गोईलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यक्रमास पर्यवेक्षक डी. एस. गुरव, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. बी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. आभार कु. मधुरा देसाई हिने मानले.











