पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसाळे याला कांस्य पदक
नवी दिल्ली : पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन (3पी) प्रकारात भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्निलने चिकाटी आणि अचूकतेचे उत्तम दर्शन घडवत हे टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स दर्जासाठी योग्य खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. प्रत्येक फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने एकूण 451.4 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आणि देशासाठी कांस्य पदक जिंकले. भारताचे हे पॅरीस ऑलिम्पिक्समधील तिसरे पदक ठरले असून ही तिन्ही पदके नेमबाजीच्या विविध प्रकारांमध्ये मिळाली आहेत. स्वप्निल कुसाळे हा मुळचा कोल्हापूरचा सुपुत्र आहे.
दिनांक 6 ऑगस्ट 1995 रोजी एका शेतकरी कुटुंबात स्वप्निल कुसाळेचा जन्म झाला. 2009 मध्ये स्वप्निलच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक क्रीडा उपक्रम – क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन दिला. तेव्हापासून त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. एक वर्ष कठोर शारिरीक प्रशिक्षणानंतर एका क्रीडाप्रकाराची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने नेमबाजीची निवड केली. 2013 मध्ये त्याला लक्ष्य स्पोर्ट्सचे प्रायोजकत्व मिळाले. 2015 मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन 3 प्रकारात जुनिअर गटात सुवर्ण पदक पटकावले. तुघलकाबाद इथे झालेल्या 59व्या राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग आणि चैन सिंहला मागे टाकत विजेतेपद मिळवले. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्याने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या 61व्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावून केली.
स्वप्निलने आतापर्यंत मिळवलेले यश
जागतिक विजेतेपद -कैरो (2022) – चौथे स्थान मिळवून भारतासाठी ऑलिम्पिक कोटाद्वारे पात्र ठरला.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 – सांघिक प्रकारात सुवर्ण पदक.
विश्वचषक - बाकू (2023) – मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण आणि वैयक्तिक व सांघिक प्रकारात दोन रौप्य पदके.
जागतिक विजेतेपद - कैरो (2022) – सांघिक प्रकारात कांस्य पदक.
जागतिक चषक - नवी दिल्ली (2021) – सांघिक प्रकारात सुवर्ण पदक.

