Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्व विद्यार्थ्यांच्या मनामनात असणारे आदर्श शिक्षक राजेंद्र खोराटे सर...!

हिडदुगी हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनी सौ. रुपाली रेडेकर - रणदिवे यांनी सांगितल्या आठवणी 


मुख्याध्यापक श्री. खोराटे सरांना सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभा निमित्त दिल्या शुभेच्छा 





गडहिंग्लज तालुक्यातील हिडदुग्गी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे सर प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्य शुभेच्छा समारंभ व राजगौरव अंक प्रकाशन सोहळा देखील हिडदुग्गी येथे पार पडत आहे. आदर्श मुख्याध्यापक म्हणून ओळख असणारे राजेंद्र खोराटे सर यांनी ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम आजपर्यंत केले आहे. त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली आज विविध शासकीय, निमशासकीय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सानिध्यात शिकलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाहीत. नोकरीच्या निमित्ताने मुले व विवाहनंतर मुली आज गावापासून दूर असले तरी खोराटे सरांच्या सेवानिवृत्ती समारंभाकडे त्यांचे लक्ष लागून आहे, कार्यक्रमाला येण्याची ओढ आहे मात्र काही कारणास्तव शक्य होत नाही. त्यामुळे खोराटे सरांकडून शिक्षणाची शिदोरी घेतलेल्या मुळच्या हिडदुग्गी येथील त्यांच्या माजी विद्यार्थिनी सौ. रूपाली रेडेकर- रणदिवे यांनी खोराटे सरांकडून मिळालेले संस्कार, त्यांचे व्यक्तिमत्व याबद्दल लिखाण करत खोराटे सरांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत, वाचूया त्यांच्याच शब्दात.....



आज 4 ऑगस्ट मुख्याध्यापक आदरणीय श्री. राजेंद्र खोराटे सरांचा सेवा निवृत्तीचा मोठा कार्यक्रम शाळेत आहे. आई - वडीलानंतर आपले शिक्षकच आपले गुरू असतात. गुरु म्हणजे आपल्यावर अप्रत्यक्षरीत्या झालेल्या संस्कारांची शिदोरी आपल्या सोबत असते. त्याचा 34 वर्षांचा कार्यकाळ बघता बघता निघून गेल्यासारखं वाटलं. माजी विद्यार्थी (प्रेक्षक) म्हणून आपली हजेरी असावी अस वाटलं पण ते शक्य नव्हत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे 11 मे 2024 ला आम्ही आयोजीत केलेला सत्कार सोहळा. सरांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक हा मिळालेला पुरस्कार सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि सोबत अजूनही मिळालेल्या पुरस्कारांचा आनंद साजरा करण्यासाठी सत्कार सोहळा ठेवला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतं होते. कारण त्या कार्यक्रमाला 1990-2024 पर्यंत चे आजी- माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. सगळे विद्यार्थी अगदी मनापासुन आनंदी होते. कारण सगळ्यांनाच अस वाटत होत की, सरांची सेवानिवृत्ती होण्याआधी असा सोहळा झाला पाहिजे, आणि तो दुग्ध-शर्करा योग जुळून आला व कार्यक्रम अगदी थाटात पार पडला. सगळ्यानी मोबाइल आणि डोळ्यांमध्ये साठवून घेतला. या सगळ्याच मनोमन खूप समाधान वाटत होत.



आदरणीय श्री. खोराटे सर यांनी गेली 34 वर्ष शाळेची धुरा अगदी काटेकोरपणे सांभाळली. त्यांचा नम्र स्वभाव, शांत बोलणं पण त्या शांत बोलण्यातही एकप्रकारचा दरारा होता. आणि तोच स्वभाव विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा होता. त्यांची शरीरयष्टी सडपातळ असली तरी 'एव्हर ग्रीन' म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आम्ही चारही भावंड त्यांच्या हाताखाली शिकलो. माझी मोठी बहीण 1991 च्या बॅचची तेव्हाही ते तसेच होते. दुसरी बहीण आजी झाली आताही ते तसेच दिसतात. त्यांनी शाळेला शिस्तीची सवय लावली. आणि स्वतःही शिस्तीतच राहणं अशा सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती असे. ते आठवी ते दहावी मराठी विषय शिकवत असत. आपले व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे ते स्मितहास्य असणारा चेहरा सगळ्या विद्यार्थांच्या मनामनात आहे. कारण अगदी खोडकर मुलापासून ते शाळेतील शिपाई मामांपर्यंत सगळेच त्यांचा आदर करतात. त्यांच्याबाबतीत 'वड्यावरच तेल वांग्यावर' अस कधी झालच नाही. त्यांनी कवी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता एवढी एकरूप होऊन शिकवली होती की, कवितेतली सगळी चित्र जणू डोळ्यासमोर अलगद उभी राहिली होती. त्यांनी आपल्या दिनचर्येत कधीच बदल होऊ दिला नाही. वेळेच्या अगोदर हजर राहणे हे त्याचं ठरलेलंच असायचं.



मुख्याध्यापक श्री. खोराटे सर सेवानिवृत्त होत असल्याने शाळा देखील काय म्हणते याचे वर्णन सौ. रुपाली रेडेकर - रणदिवे कवितेच्या माध्यमातून सांगतात की.....


होय मी आपलीच शाळा बोलतेय.... 


              मी पाहते तुम्हाला 

              जरी निर्जीव मी तरी

              सांभाळलं आजपर्यंत 

              आपल्याच मुला परी |


                       दिनचर्या कधी न ढळली 

                       इथं आपली आजवरी

                       माझी बालके असतील

                       आपले सदैव ऋणी|


              गुलमोहरात वास ही माझा 

              अंतकरण जरी न दिसले

              घडविली काहिक पिल्ले 

              गगनी पक्षी उडूनी गेले |


                   पुरस्कारांचा कितीदा सोहळा

                    नाव माझे कुठवर गेले

                    आपल्या पुरस्कारांनी 

                     लौकिक रूप दिले‌ |


            स्मितहास्य नेहमीच आपले

             माझ्या प्रांगनी मलाच दिसले 

              केली माझी सदा सेवा 

              हे माझेच भाग्य सजले |


                  निवृत्तीचा निरोप देता 

                  मला ही रडावेसे वाटते 

                  शिस्तीचा आठवतो दरारा 

                  मी अलगद डोळे पुसते |


 

शाळेवर आलेल्या अनपेक्षित संकटाना धीराने तोंड देत शाळेची प्रतिमा गढूळ होऊ दिली नाही. शाळेला मिळालेला स्वच्छ आणि आदर्श शाळा हा पुरस्कार हे त्याचच एक उदाहरण आहे. त्यांच्या हाताखाली शिकलेले काही विद्यार्थी सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर काही शिक्षक तर काही परदेशातही गेले आहेत. त्यांनी कष्ट घेऊन आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पोचपावती त्यांना पुरस्कार स्वरुपात मिळाली. 



त्यांना १) कै. केदारी रेडेकर गुणवंत शिक्षक पुरस्कार - सन २०१५, २) कै. दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार - सन २०१६,  ३) गुरुवर्य - जी. बी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार - २०१७, ४) कोजीम प्रेरणा पुरस्कार - सन -२०१८-२०१९, ५) महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार - २०२३-२०२४, ६) दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा ही त्यांना २०२४ मध्ये त्यांना मिळाला. अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकाचे आम्ही विद्यार्थी आहोत याचा आम्हा सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे.  सेवानिवृत्ती निमित्य व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा.


त्याचबरोबर हिडदुगी हायस्कूल हिडदुगीच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झालेल्या सतिश सुभाना रेडेकर सर यांचे देखील खूप खूप अभिनंदन आणि शाळेचा पुढील कार्यभार सांभाळण्यासाठी त्यांनाही हार्दिक शुभेच्छा...!


           शब्दांकन.....

                                 


                   सौ. रुपाली रेडेकर - रणदिवे 

                      मूळ गाव- हिडदुगी (ता. गडहिंग्लज)

                         (बॅच २०००-२००१)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.