सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली क्षमा
महाराष्ट्रातील पालघर येथे सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराची केली पायाभरणी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातील पालघरमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी केली. यावेळी सर्वप्रथम सिंधुदुर्गातील दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एक दैवत असल्याचे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर आपले मस्तक ठेवून विनम्रतेने क्षमा मागितली.
आजच्या प्रकल्पांमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराची पायाभरणी आणि सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी यांचा समावेश आहे. मोदी यांनी सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या वेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी मासेमारी बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, फिश लँडिंग सेंटर आणि फिश मार्केटच्या बांधकामासह महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचीही पायाभरणी केली. त्यांनी मच्छिमार लाभार्थ्यांना ट्रान्सपॉन्डर सेट आणि किसान क्रेडिट कार्डचे वितरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत सेनाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून केली. मोदी यांनी आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त केल्या आणि 2013 मध्ये पंतप्रधानपदासाठी आपल्याला नामांकन मिळाल्यावर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर प्रार्थना करण्यासाठी रायगड किल्ल्याला भेट दिल्याची आठवण सांगितली. त्यांनी सांगितले की, ज्या भक्तीभावाने मी माझ्या दैवताला वंदन केले त्याच ‘भक्तीभावा’चा मला आशीर्वाद मिळाला आणि देशाच्या सेवेसाठी नवीन प्रवास सुरू केला. महाराष्ट्रात आल्यावर आपण सर्वात आधी जर कोणती गोष्ट केली असेल तर ती म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली, असे मोदी यांनी अधोरेखित केले. शिवाजी महाराज यांची जे पूजा करतात त्यांची देखील आपण माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे राज्य आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात आजचा हा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगत, पंतप्रधान म्हणाले की विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याने आपल्या सरकारने गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासकालीन सागरी व्यापाराचा संदर्भ देत मोदी म्हणाले की किनारपट्टीच्या संपर्कात असल्याने या राज्यात विकासाकरिता आवश्यक असलेली क्षमता आणि संसाधने आहेत. “वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल आणि जगातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरेल. महाराष्ट्र आणि भारताच्या औद्योगिक विकासाचे आणि व्यापाराचे ते केंद्र बनेल,” असे ते म्हणाले.





