महागाव व हसुरवाडी येथील संत गजानन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपाला पाठिंबा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील महिला डॉक्टरांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. दरम्यान आज महागाव व हसुरवाडी येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळून हॉस्पिटलचे इतर कामकाज बंद ठेवून देशव्यापी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा दिला.
कोलकत्ता येथील आर.जी.कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रात जोरदार आवाज उठवला जात आहे. आज येथील आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढत काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. फार्मसी कॉलेज पासून मोर्चेस प्रारंभ झाला. निषेध व्यक्त करणारे फलक प्रत्येक विद्यार्थ्याने हातात घेतला होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात मेणबत्ती पेटवून स्तब्धता पाळून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहिली.
![]() |
| महागाव : येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात कोलकत्ता येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहताना महाविद्यालयीन विद्यार्थी. |
यावेळी प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने लक्ष देवून त्यांना सुरक्षा मिळायला हवी आहे. जेणेकरून अशा घटना घडण्यापासून थांबेल. या घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी डॉ. गणेश आडीलकर, डॉ. महेश साळुंखे, डॉ. शकील सुतार,डॉ शर्मिली पाटील, डॉ. शिल्पा शिंदे, डॉ. अस्मिता कांबळे, डॉ. प्रीती रावळ, डॉ. तेजल पोखरापूरकर, डॉ.संगिता मनगुळे यासह डॉक्टर्स, परिचारिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



