पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून मंडळाला मानाचा शाल प्रदान
मानाच्या शालीचे करण्यात आले मोठ्या भक्तीभावाने पूजन
ट्रस्टच्या दरबारी श्री रामलिंग मंडळाच्या गणेश मूर्तीची झाली नोंद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णीतील रामलिंग गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीची दखल पुणे येथील दगडूशेठ हलवाई ट्रस्टने घेतली असून या मंडळाला मानाचा शाल देण्यात आला आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दरबारी हलकर्णीच्या मंडळाची नोंद झाल्याने नावलौकिक वाढला आहे. यामुळे यंदा या गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून हलकर्णी ओळखली जाते. या ठिकाणी श्री रामलिंग देवाच्या मंदिराजवळ गेली ५२ वर्षे झाली श्री रामलिंग गणेश मंडळाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई पद्धतीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाचे हे ५३ वे वर्ष आहे. हलकर्णी पंचक्रोशीत या मंडळाची ही गणेशमूर्ती प्रसिद्ध असते. प्रती दगडूशेठ गणेश मूर्ती म्हणूनच येथील भाविक या गणेशमूर्तीकडे दरवर्षी पाहतात. हजारो भाविक या गणेशमूर्तीचे दर्शन घेत नवस मागून घेतात व ते नवस पूर्ण झाल्याचा अनुभव गणेश भक्तांना आहे. त्यामुळे गणेश मूर्तीची देखील नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याची दखल साक्षात पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने घेतली आहे. त्यांच्या दरबारी या गणेश मंडळाची नोंद घेत मानाचा शाल हलकर्णीच्या श्री रामलिंग गणेश मंडळाला देण्यात आला आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून मानाचा शाल मिळवणारे दुसरे मंडळ म्हणून या मंडळाने स्थान मिळवले आहे. यावेळी मानाच्या या शालीचे पूजन व मंडळाच्या पितळी गणपतीस अभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. रामलिंग गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रसाद जोशी, गौतम सन्माने, अमर व्हसकोटी, विनीत गुरव, अरिहंत शिखरी, करण नावलगी,प्रज्वल उपाध्ये, प्रभाकर हिरेमठ,शुभम गुरव, सूरज हवालदार, अक्षय हिरेमठ, रमेश रामाजगोळ, मलिकर्जून पाटील,सुनील चौगुले, रामचंद्र शिखरी, सुरेश रामाजगोळ, शिवगोंडा पाटील, विठ्ठल नावलगी, अभिजित पाटील, भूपाल शिखरी, निखिल मुन्नोळी, चेतन ससालत्ती, हेमंत शेरवी, पार्श्वनाथ धूपदाले यांचा समावेश आहे.



