सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी एटीएम मशीन लक्ष्य केल्याने खळबळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागावमध्ये रविवारी रात्री आणखी एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी एका खाजगी कंपनीचा एटीएम फोडण्यात आला होता. पुन्हा रविवारी रात्री येथील जनता बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या दोन्ही घटनेमुळे महागावमधील व्यापारी व नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली असून पंचनामा सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी रात्री महागावातील जनता बँकेच्या गाळ्यातील एटीएम चोरट्यानी फोडण्याचा प्रयत्न केला. मशीनचा वरचा भाग कापताना आलारामचा आवाज झाल्याने बँकेमध्ये झोपण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्याला जाग आल्याने त्याने लाईट लावून आवाज दिल्यानंतर चोरटे तेथून पळून गेले. सदर घटनेची माहिती बँकेने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली असून चोरट्यांचा माग काढला जात आहे. या एटीएम मधील रोकड चोरीस गेली किंवा नाही याची माहिती अद्याप मिळालेली नसून पोलिसांचा पंचनामा सुरू आहे.
सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांचे एटीएम लक्ष्य
दरम्यान, शनिवारी पहाटे पाच रस्ता येथील खाजगी कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडून एटीएम मशीनचे नुकसान केले होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी जनता बँकेचे एटीएम त्याच पद्धतीने फोडून मशीनचे नुकसान केले आहे. सलग दोन दिवस चोरट्यानी एटीएम मशीनला लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


