भक्तिभावाने प्रतिकात्मक मातीच्या मूर्तींचे पूजन
नागपंचमी निमित्त सर्पमित्रांचे देखील आभार मानण्याची गरज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नागपंचमीनिमित्त घरोघरी आज नागोबाच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तीपूर्ण वातावरणात देवघरात नागोबाचे पूजन करण्यात आले. उद्या नागपंचमी सणाचा मुख्य दिवस आहे.
साप हा शेताचा रक्षणकर्ता मानला जातो त्यामुळे तो शेतकरी बांधवांचा एक अर्थाने मित्र मानला जातो. कारण शेतातील उंदीर, घुशी नाग खात असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत नाही. त्यामुळे दरवर्षी नागपंचमी सणाच्या निमित्ताने त्याची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी शेतात खोदणे, नांगरणे आधी कामे टाळली जातात. दरवर्षी श्रावण मासात हा सण येतो. नागाला साक्षात भगवान शंकराच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे. त्यामुळे नागपंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे.
नागपंचमी सणाच्या निमित्ताने मातीच्या नागोबाच्या मूर्ती कुंभार बांधव तयार करतात. नागपंचमी सणाच्या आदल्या दिवशी या मूर्तींचे घरोघरी पूजन करण्याची प्रथा आहे. पूर्वी नागरिक कुंभार बांधवांच्या घरी नागाच्या मूर्ती आणण्यासाठी गर्दी करत होते. आता गावोगावी कुंभार बांधव या नागोबांच्या मातीच्या मूर्ती घरोघरी पोच करत असल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे. शहरात ठीक ठिकाणी या नागोबांच्या विविध मातीच्या मूर्ती विक्रीस ठेवल्या जातात. एक मूर्ती वीस रुपये या दराने विक्री केली जाते. मोठ्या भक्ती भावाने नागदेवतेचे नागरिकांनी स्वागत करत आपल्या देवघरात मूर्तींचे पूजन केले. उद्या नागपंचमी सणाचा मुख्य दिवस आहे. घरोघरी नैवेद्यासाठी लाडू, चिवडा, लाह्या आदी पदार्थ बनविण्यात महिलावर्ग मग्न आहेत. उद्या नागोबाच्या मूर्तीला गोडाचा नैवेद्य दाखवून दूध वाहिले जाते.
पूर्वी नागपंचमीचा सण आला की खेडोपाड्यात महिला एकत्रित येत गाणी म्हणायच्या. झिम्मा फुगडी खेळ खेळले जायचे. झाडाला झोके बांधून या झोक्यांचा आनंद घेतला जायचा. ग्रामीण भागात आता हळूहळू याचे प्रमाण देखील कमी होताना दिसत आहे.
नागपंचमी निमित्त सर्पमित्रांचे देखील आभार मानण्याची गरज
साप म्हटले की माणूस घाबरतो. शेतात, घरात, परिसरात उंदीर, घुशी, पाली अशा विविध खाद्यांच्या शोधात असताना साप आपल्या नजरेस पडतात. काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात. मात्र घाबरून साप दिसला की त्याला मारले जाते. मात्र या सापांचे संवर्धन व जनजागृती करण्याचे काम प्रामुख्याने सर्पमित्र करत असतात. मानवी वस्तीत आलेल्या सापांना जिवंत पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. पकडलेले साप विषारी आहे की बिनविषारी आहे याची जनजागृती हे सर्पमित्र करत असतात. जिवंत साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे हे फार जोखमीचे काम असते. प्रसंगी जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी सुरक्षित साधने बाळगावी लागतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना भयमुक्त व सापांना संरक्षण देणाऱ्या या सर्पमित्रांचा देखील नागपंचमी सणाच्या निमित्ताने आभार मानत त्यांचा आदर सत्कार करण्याची आज खरी गरज आहे.




