ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन
चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यात वायूवेग पथक तैनात करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी येथून मुंबई व पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्या खासगी आराम बसचे दरपत्रक निश्चित करून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण त्यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
मुंबई व पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असणारे चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दीपावली या सणानिमित्त मोठ्या संख्येने गावी येतात. या हंगामांमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्याने नाईलाजाने गावाकडे येण्यासाठी व जाण्यासाठी या चाकरमान्यांना खासगी आराम बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र या संधीचा गैरफायदा घेत हे आराम बस मालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून एक प्रकारची लूटच करतात. या खासगी आराम बस मालकांवर कोणाचाच अंकुश नसल्याने मनमानी दर आकारले जातात. त्यामुळे याला चाप बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 24 तास हेल्पलाइन नंबर चालू ठेवण्यात यावी, गणेशोत्सवापूर्वी व नंतर अंतिम दोन दिवस वायुवेग पथक तालुक्याच्या ठिकाणी तैनात करून प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी आराम बसेसवर कारवाई करावी, सर्व खासगी बसेसचे फिटनेस तपासून हलगर्जीपणा आढळल्यास परवाने रद्द करावेत, येत्या आठ दिवसात या संदर्भातील कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या सह्या आहेत.

