पुणे येथील टीमने पहाणी करत घेतली माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलासंदर्भात आज पुणे येथील टीमने पाहणी करत प्राथमिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी माहिती घेतली.
दरवर्षी पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीला पूर येत असल्याने या नदीवरील भडगाव पूल पाण्याखाली जातो. यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक तब्बल आठ ते दहा दिवस बंद असते. यामुळे गडहिंग्लज तालुक्याचा संपर्क तुटतो. परिणामी शालेय विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी वर्ग व नागरिकांचे मोठे हाल होतात. या समस्येकडे विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलने करत पुलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे येथील एका खासगी एजन्सीच्या टीमने नदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुराचे पाणी कुठपर्यंत येते, नवीन पूल बांधण्यासाठी गाळे किती घ्यावे लागतील, नदीच्या पाण्याची पातळी यासह विविध बाबींची त्यांनी पाहणी केली. या माध्यमातून प्राथमिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. यावेळी गडहिंग्लज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत गिरी उपस्थित होते.


