एमआर हायस्कूल उपविजेता
स्वरुप शेटके ठरला स्पर्धावीर
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवराज इंग्लीश मिडियम स्कुलने नवोदित महाराणी राधाबाई हायस्कुलचा (एम.आर.) ४-० असा सहज पराभव करत विजेतेपद पटकाविले. एम.आर. हायस्कुलचा खेळाडू स्वरूप शेटकेने स्पर्धावीरचा बहूमान पटकाविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुनिल चौगुले यांच्या स्मृतीपित्यर्थ एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर गेले दोन दिवस या स्पर्धा सुरु होत्या. स्पर्धेत १२ संघानी सहभाग घेतला होता.
अंतिम सामन्यात पूर्वाधात एमआर हायस्कुलचा कर्णधार स्वरूप शेटके, श्रषीकेश भोसले यांनी सातत्याने चढाई करून शिवराजला दबावाखाली ठेवले. शिवराजच्या आलोक पाटीलने १० व्या मिनिटाला बचावपटूंना चकवित गोलक्षेत्रात मुंसडी मारून अखिलेश कुराडेला सुरेख पास दिला. यावर कुराडेने अचूक मैदानी गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलने एमआरचा खेळ विस्कळीत झाला. कुराडेने पुन्हा संघाचा आणि आपला दुसरा गोल करून २-० अशी संघाची भक्कम स्थिती केली. उत्तरार्धातही शिवराजच्या कुराडेने गोल करीत हैटट्रीक केली. शेवटी आलोक पाटीलने संघाचा चौथा गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, प्राचार्य संजय कुंभार, मल्लिकार्जून बेल्लद, महादेव पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा प्रमुख सुल्तान शेख यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी सौ. गौरी संकपाळ, प्रशांत बाटे, शक्ती चौगुले, ॲड. सतिश इटी, श्री. कोले, प्रशांत दड्डीकर यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते. यावेळी समन्वयक पार्थ म्हेत्री, यश पाटील यांचा गौरव झाला. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. ओमकार घुगरी, सुरज हनिमनाळे, प्रसाद पोवार, श्रवण पाटील, आर्यन दळवी यांनी पंच म्हणून काम केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
स्पर्धावीर - स्वरूप शेटके ( एम.आर)
गोलरक्षक- पार्थ रोटे (शिंदे हायस्कुल)
बचावपटू- अरिंजय हातरोटे (शिवराज)
मध्यरक्षक- आदर्श पन्हाळकर( होरायझन)
आघाडीपटू – आलोक पाटील ( शिवराज).



