गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग व संभाजीराव माने ज्युनिअर विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवीन मतदार नोंदणी, आधार कार्ड नोंदणी, शिक्षनासाठी लागणाऱ्या विविध आवश्यक कागदपत्रे आणि मलेरिया व डेंग्यू बाबत जनजागृती आदीबाबत शिबीर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. शिबिरामध्ये निवडणूक नायब तहसीलदार अब्दुलकरीम शेख यांनी नवीन मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नवीन मतदार नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगून मतदार नोंदणी फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता कुंभार यांनी डेंगू, मलेरिया बाबत जनजागृती करून नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
परशुराम सरनाईक यांनी महसूल विभागामार्फत वितरीत होणाऱ्या दाखल्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालक बसवराज आजरी यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अध्यक्षीय समारोपात या शिबिराचे महत्व सांगितले. यावेळी १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म भरून देण्यासाठी वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, डॉ. एस. डी. सावंत, प्रा. डी. यु. जाधव यांच्यासह प्राध्यापक, महसूल विभागाचे कर्मचारी आदीसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय खोत यांनी केले तर आभार डॉ. ए. जी. हारदारे यांनी आभार मानले.




