कोल्हापूर-पुणे महामार्गावर सध्याच्या दरात त्वरित 25 टक्के टोल माफ
उर्वरित 25 टक्के माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे लेखी पत्र
कोल्हापूर : टोल देऊनही कोल्हापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर आज आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झाले.
महामार्गाची, सेवा मार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे, टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून जाणारी सर्व वाहने मोफत सोडून देत टोल वसुली थांबवली. जोपर्यंत टोलमाफी संदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेत किणी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन केले. वाहतुकीला अडथळा न करता सुमारे पाच तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरु होते.
यावेळी सध्याच्या टोल दरात तात्काळ 25 टक्के टोल माफ करण्यात आला आहे. उर्वरित 25 टक्के माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात आमदार सतेज पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




