शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल पालकांनी व्यक्त केले समाधान
शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची केली निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ हलकर्णी संचलित, बी. एम. टोणपी मराठी विद्यालय हलकर्णी येथे पालक सभा, विद्यार्थी प्रगती, शालेय उपक्रम आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी हलकर्णी, कुंभळहाळ, नंदनवाड, तेरणी, इदरगुची, चंदनकुड या परिसरातील सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थी प्रगती व शालेय नियोजन कसे असावे शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यात यावे. याविषयी पालक शिक्षक यांच्यामध्ये संवाद झाला. शाळेचे मुख्याध्यापक ए. ए. पाटील यांनी पालक सभेचे विषय वाचन केले. के. डी. पाटील यांनी पालक सभेचे महत्त्व सांगितले. ए.बी. लवटे यांनी पालकांना विद्यार्थ्यांसंदर्भात मार्गदर्शन केले.
या पालक सभेचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समितीचे निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राजू सकुंडे व उपाध्यक्ष पदी पायगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत ड्रेस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब टोणपी, संस्थेचे सचिव सौ.अर्चना टोणपी व सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार ए. बी. लवटे यांनी मानले.





