गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांचे प्रतिपादन
महागावात विकास कामांचे उदघाटन, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
![]() |
| महागाव : येथील परशुराम तलावातील पाण्याचे पूजन करताना माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी,विनायक उर्फ अप्पी पाटील,माजी सभापती विजयराव पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, प्राचार्य आय. एस. पाटील यांच्यासह इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेज हे विद्यार्थी घडवण्यापुरतेच मर्यादित न राहता समाजासाठी देखील या महाविद्यालयाचा उपयोग झाला पाहिजे. सामाजिक जीवनात काम करताना त्याचं समाधान मिळाल पाहिजे हे माझे वडील माजी आमदार स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल सुरू आहे. महागावच्या परशुराम तलावासाठी शिंदे इंजिनीरिंग कॉलेजने पाट स्वच्छतेचे काम केले आणि आज हा तलाव भरलेला पाहून आपण गावला उपयोगी असे शाश्वत काम केलो याचं समाधान मिळालं आहे, असे प्रतिपादन गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांनी केले.
महागाव येथील विविध विकास कामांचे उदघाटन, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील, माजी सभापती विजयराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परशुराम तलावाचे पाणी पूजन माजी नगराध्यक्षा सौ. कोरी, वॉटर एटीएमचे उदघाटन माजी सभापती विजयराव पाटील यांच्या हस्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह फलकाचे अनावरण अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सरपंच प्रशांत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा सौ. कोरी पुढे म्हणाल्या, ग्राम स्वच्छतेबरोबरच महागाव येथील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परशुराम तलावाचा होता. अप्पी पाटील कुटुंबीयांच्या प्रयत्नाने या तलावाला सायफन पद्धतीने आतापर्यंत पाणी मिळत आलं आहे. या तलावाला नैसर्गिकरित्या येणारे पाण्याचे पाट मुजल्यामुळे पाणी येण्यात अडचणी होत्या. ते पाट खुला करण्याची नितांत गरज होती. या अनुषंगाने शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून सहकार्य करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून दिले. सार्वजनिक जीवनात काम करत असताना माझे वडील माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे मला नेहमी सांगायचे की, काम केल्यानंतर त्याच समाधान मिळाल पाहिजे. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केल्यानंतर कॉलेज केवळ विद्यार्थी घडवण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग समाजासाठी देखील झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या विचाराला अनुसरूनच शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचे काम सुरू आहे. महागाव येथील परशुराम तलावासाठी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजने योगदान दिल्याने तलाव भरण्यास मदत झाली व आम्ही गावच्या उपयोगी पडलो याच मोठं समाधान असल्याच सांगून यापुढे देखील असेच सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
अप्पी पाटील म्हणाले, ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा पाया आहे, त्यांनी गावाला शुद्ध,पाणी, आरोग्य, वीज या मूलभूत सुविधा द्याव्यात. सध्या महागाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चालू आहेत.तसेच स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांचे कारखान्याच्या माध्यमातून पानंद रस्ते, तसेच अनेक विकास कामे महागाव परिसरात केली आहेत. भविष्यात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या फंडाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी केले. यावेळी सुरज असवले, रोहित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अर्जुन दिवटे व आभार उपसरपंच संदीप कोकितकर यांनी मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य ॲड. हणमंतराव पाटील, प्राचार्य आय.एस. पाटील,आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन महादेव घुगरे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, ग्रा.पं.सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, परशराम हुले, विकास इंगवले,फिरोज सोलापुरे, नजीर बागवान,अनिता रेडेकर, वैशाली पाटील, हसीना सोलापुरे, गौराबाई निकम, महंमद पठाण, प्रा. पी.डी. पाटील.यांच्यासह ग्रामस्थ,ग्रामपंचायत कर्मचारी,असे आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




