१ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते आजमावून घेणार
निर्धार मेळाव्यास जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : तालुकाध्यक्ष बाळेश नाईक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघात जनता दलाचे नेते, माजी आमदार स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ. स्वातीताई कोरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच पार्श्वभूमीवर कागल किंवा चंदगड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक स्वातीताई यांनी लढवावी अशी मते येथील जनतेची आहेत. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी दिनांक १ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक यांनी दिली.
गडहिंग्लज येथील जनता दलाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष श्री. नाईक बोलत होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळेश नाईक पुढे म्हणाले, जनता दलाचे नेते माजी आमदार स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी प्रत्येक विधानसभा निवडणूक मोठ्या ताकतीने लढविली आहे. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले समाजकारण जनता कधीच विसरणार नाही. त्यांच्याच विचाराने माजी नगराध्यक्ष सौ. स्वातीताई कोरी यांची वाटचाल सुरू आहे. धुरंदर अभ्यासक, सर्वसामान्यांचे नेतृत्व, गरिबांचे आधारस्तंभ म्हणून माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नंतर सौ. स्वातीताई कोरी यांचे नेतृत्व म्हणून जनतेतून पाहिले जाते. सर्वसामान्य लोकांच्या विविध प्रश्नावर भिडायची ताकद या वाघिणीत आहे.
गडहिंग्लज नगरपालिका राजकारणाचा विचार केला असता माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने पालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष सौ. स्वातीताई कोरी यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघाचे स्वातीताई दावेदार आहेत,अशी उत्स्फूर्त मते येथील जनतेची आहेत. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. कागल व चंदगड या दोन्ही मतदारसंघात जनता दलाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पकड चांगली आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुक लढविण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व सर्व कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यासाठी दिनांक १ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याचे तालुकाध्यक्ष श्री. नाईक यांनी सांगितले. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंटी कोरी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आजरा तालुका जनता दलाचे अध्यक्ष सदानंद व्हनबट्टे, चंदगड तालुका अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, श्रीरंग उर्फ पापा चौगुले, भूषण देशमाने, रमेश ढोणुक्षे, उदय कदम, बाळकृष्ण परीट, भीमराव पाटील, रमेश मगदूम, शशिकांत चोथे, महांतेश पाटील, प्रशांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राम पाटील, माजी नगरसेवक राजेश बोरगावे, नितीन देसाई, बाळासाहेब भैसकर, काशिनाथ बेळगुद्री, संजय रोटे, प्रकाश म्हेत्री यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




