शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा महिलांना शब्द
महागाव येथे पार पडला नारीशक्ती व कार्यकर्ता संवाद मेळावा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्या राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, याकडे लक्ष वेधत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था करू असा शब्द शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिरकणी महोत्सव : नारीशक्ती मेळावा व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. सौ. नंदाताई कुपेकर बाभुळकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित होत्या.
प्रारंभी हिरकणी महोत्सव पार पडला. या महोत्सवात अभिनेता ऋषिकेश शेलार, अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री प्रधान यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी आयोजित उखाणे स्पर्धेचे बक्षीस वितरण या कलाकारांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची काम करण्याची पद्धत साधी आहे. आमच्याकडे साधन संपत्ती मर्यादित आहे, मात्र महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आशीर्वाद व शरदचंद्र पवार नावाची मोठी शक्ती आमच्याकडे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की यशस्वी होवू. चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. शरदचंद्र पवार यांना दगा दिलेल्या लोकांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी एकसंघपणे ताकद उभे करून प्रत्येक घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवावे. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महिलांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक संघपणे प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले. राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी हे सरकार बदलण्यासाठी आपली पावले पुढे टाकण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सरकारचा पूर्ण कारभारच चव्हाट्यावर आला आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली. येथील विविध प्रश्न मार्गी लावले. जनतेमध्ये विकास कामातून त्यांनी विश्वास निर्माण केला. आज त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची माणसं, त्यांची संघटना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन झटत आहे. त्यामुळे येथील जनतेने त्यांना साथ देऊन शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करावेत असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राज्यातील महिला या सरकारला योग्य जागा दाखवतील : डॉ. सौ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर
डॉ. सौ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत काही पक्षांना अपेक्षित यश मिळाले नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय समजेना असे झाले आहे. भोळ्या भाबड्या महिलांना काय समजत नाही, त्यांना आमिषे दाखवून निवडणुका जिंकू या भ्रमात ते आहेत. मात्र राज्यातील महिला या डोळे उघडून निवडणुकीला सामोरे जातील व त्यांना योग्य जागा दाखवतील असा विश्वास मला आहे. शेतकऱ्यांच्या खते व बियाण्यांवर देखील जीएसटी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे या सरकारने मोडले आहे. महागाईचा आगडोंब उसळल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात हे सर्व प्रश्न असताना केवळ मतदारांना अमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे जनतेने आमिषाला बळी न पडता शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनिषा तेली, माजी प. स. सभापती अमर चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, सरसेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपा पाटील, सुश्रुत बाभुळकर, शिवाजीराव खोत, अनिल घाटगे,आजरा तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष शिवाजीराव माने, चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजीराव सावंत, शिवानंद माळी, रुपा खांडेकर, उदय चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रामराजे कुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.


