अपघातात दोन ठार, 13 जण जखमी ; दोघेजण अत्यवस्थ
निपाणी : तवंदी घाटात भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल सात वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात दोघेजण ठार झाले असून तेराजण जखमी झाले आहेत. जबीन महंमदहुसेन मकानदार ( निपाणी), संतोष गणपती माने (रा. खडकलाट) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातातील दिलदार मुल्ला व रेखा गाडीवडर हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर कंटेनर हुबळीहुन कराडकडे माल वाहतुकीसाठी जात होता. दरम्यान, तवंदी घाटातील हॉटेल व्हाईट हाऊस नजीक आल्यानंतर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे या कंटेनरने समोरून दुचाकीवरून येणाऱ्या संतोष माने यांना जोरदार धडक दिली. यामध्ये माने यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या कंटेनरने ट्रक, आयशर या दोन वाहनांना धडक देत एका कारवर जाऊन आदळली. त्यामुळे या कार मधील जबीन मकानदार यांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील परविन मुल्ला, दिलदार मुल्ला, साफिया मुल्ला, नुसरा मुल्ला हे चार जण जखमी झाले आहेत.
त्यानंतर पुढे साताराकडे जाणाऱ्या आणखी एका कारलाही या कंटेनरने जोराची धडक दिली. त्यामुळे कारमधील मंजुनाथ तेंडुलकर, सुपर्णा नेगुलकर, श्रेया निगुलकर हे जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर बेळगाव कोल्हापूर मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत बनली होती. पोलिसांनी व रस्ता करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.





