Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नियोजित बेळगाव-कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत सीमा भागातील नागरिकांनी घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर-कागल-निपाणी-आजरा-गडहिंग्लज - चंदगड- बेळगाव असा रेल्वेमार्ग करण्याची मागणी


कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर नजीक घेतली भेट घेत दिले निवेदन 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करत वेधण्यात आले लक्ष 



संकेश्वर : केंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमाणा यांच्याशी चर्चा करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्यानावर. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी  व नागरिक.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): नियोजित बेळगाव- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा कोल्हापूर-कागल- निपाणी-आजरा-गडहिंग्लज - चंदगड बेळगाव या मार्गे करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर विभागातील प्रवासी, व्यापारी व सीमा भागातील नागरिकांनी केंद्रीय रेल्वे व जलशक्ती  राज्यमंत्री व्ही. सोमाणा यांच्याकडे  केली. 




रेल्वे राज्यमंत्री श्री. सोमाणा हे कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरुवात कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक नागरिकांनी रेल्वे राज्यमंत्री श्री. सोमाणा यांची भेट घेत याकडे त्यांचे लक्ष वेधले  व त्यांना निवेदन देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्राथमिक सर्व्हे करण्यासाठी भारत सरकारच्या रेल्वे खात्याने मंजुरी दिली असून ते काम लवकरच सुरु होणार आहे असे समजते. सदर मार्ग हा घटप्रभा, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर असा राहण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता सध्यस्थितीत मिरज- बेळगाव हा रेल्वे मार्ग अस्तित्वात असून रायबाग, चिकोडी, हुक्केरी, घटप्रभा या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. असे असताना सदर नवीन नियोजित रेल्वे मार्गही त्याला समांतर जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर - बेळगाव रेल्वे मार्ग कोल्हापूर-कागल- निपाणी-आजरा-गडहिंग्लज - चंदगड बेळगाव अशी झाल्यास दक्षिण महाराष्ट्रातील चंदगड - आजरा- - गडहिंग्लज - कागल- भुदरगड-राधानगरी तसेच उत्तर कर्नाटकातील बेळगाव ग्रामीण,  हुक्केरी, हत्तरकी तसेच यमकनमर्डी या भागातील जनतेला त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या या भागात कोणत्याही प्रकारची रेल्वे सेवा उपलब्ध नाही.




या विभागात २० ते २५ साखर कारखाने व औद्योगिक वसाहती आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमाल,  दुध, साखर इत्यादी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या विभागातून दररोज नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने दहा हजार प्रवासी कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी प्रवास करीत असतात. त्यामुळे या प्रवाशांना प्रवासासाठी रोडशिवाय पर्याय नाही. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील बेळगाव जिल्हा हे दोन्ही जिल्हे महत्त्वाचे व सर्वदृष्टीने विकसित जिल्हे म्हणून ओळखले जातात. ही दोन शहरे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचे असून शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात अति प्रगतशील शहरे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन शहरांना जोडणारा नियोजित बेळगाव- कोल्हापूर हा रेल्वे मार्ग महत्वाचा कॉरिडोर ठरणार आहे.



बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग 


बेळगांव सावंतवाडी ह्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे लाईन जोडले जाणारा कॉरिडोर आहे. सध्या मोपा अंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर झाल्याने विजयपूर, बागलकोट, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा रेल्वेमार्ग सोयीचे आहे.



अलीकडे संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक तापमान वाढीचा विषय हा अत्यंत गंभीर व ऐरणीचा ठरत आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली सक्षम करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित, सुखकर, पर्यावरण पूरक व किफायतशीर प्रवास सर्वांना रेल्वेचे माध्यमातून होते. त्यामुळे रोडवरची गर्दी कमी होईल तसेच रस्ते अपघात,  प्रदूषण कमी होईल म्हणून या वरील मागणीकडे सरकारने गांभीर्याने पाहणे व त्यांना प्राधान्यक्रम देणे ही सध्याची गरज आहे. याकडे रेल्वे राज्यमंत्र्यांचे या निवेदनातून लक्ष वेधले आहे.



निवेदनावर बाबासाहेब आजरी, दिलीप बेळगुद्री, आप्पासाहेब चौडाज, ॲड. आप्पासाहेब जाधव, अशोक पाटील, सुभाष पाटील, ओंकार पाटील, ॲड. मिलिंद नेर्लीकर, केम्पन्ना जाधव, दयानंद जरळी, दुरदुंडी सुतार, जयानंद जाधव, शिवानंद गिजवणे, हणमंत जाधव, श्रीनिवास जाधव, विठ्ठल सुतार, संतोष जाधव, बालाजी जाधव, संदीप जरळी, करण जाधव, लगमगोंडा पाटील, अर्जुन जाधव, निरंजन जरळी यांच्यासह सीमा भागातील नागरिक व व्यापारी यांच्या सह्या आहेत.


 व्हिडिओ येथे पहा 👇👇





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.