गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरातील पथविक्रेत्यांवर पोलिसांनी अचानक कारवाई करत त्यांना हटविण्याचा प्रयत्न झाल्याने संतप्त भावना व्यक्त झाल्या. या विरोधात शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या विक्रेत्यांच्या बाजूने उभे राहत ऐन सणात कारवाई न करण्याची मागणी पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडे केल्याने कारवाई थांबविण्यात आली.
गडहिंग्लज शहरात फुटपाथवर विविध विक्रेते आपली दुकाने लावून व्यवसाय करतात. नुकतेच पथविक्रेता समिती देखील कार्यरत झाली आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर तक्रारी प्राप्त झाल्याने आज पोलिसांनी अचानक फुटपाथ वरील विक्रेत्यांना हटविण्यास सुरुवात केल्याने विक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला. ऐन गणेशोत्सव सणात पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतल्याने विक्रेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पथविक्रेत्यांवर कारवाईची माहिती सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने या कारवाईला विरोध करत सणासुदीत पथविक्रेत्यांवर कारवाई न करण्याची मागणी केली. या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत याकडे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांकडून तक्रारी आल्याने कारवाई केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पोलिसांनी ही कारवाई थांबवली.
फुटपाथवरील विक्रेत्यांनीही नागरिकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये अशी आपली दुकाने मांडावीत अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी व पोलिसांनी केल्या. या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गणेशोत्सवानंतर संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.
बाहेरील व्यापारी शिस्त बिघडवतात, मात्र नियमित विक्रेत्यांना याचा फटका बसतो!
गडहिंग्लजला दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे शिस्त बिघडते व याचा फटका नियमित फुटपाथवर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसतो. त्यामुळेच आजची ही कारवाई झाल्याची भावना या पथविक्रेत्यांनी व्यक्त केली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्ज काढून फळे व विविध साहित्य आणले आहे. मात्र अशी कारवाई झाल्याने नुकसान झाल्याचे या पथविक्रेत्यांनी सांगितले.




