मैत्रीचा सेतू बांधण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकऱ्यांना घातले साकडे
मुंबई, पुणेस्थित ग्रामस्थ मंडळांवरही लक्ष केंद्रीत
घाटगे यांचा रविवारी मुंबईत मेळावा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली विधानसभा मतदारसंघ म्हणून कागलची ओळख आहे. याठिकाणी प्रमुख लढत विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील निर्णायक ताकद असणाऱ्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला आहे. समरजीत घाटगे यांनी भाजप पासून फारकत घेतल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्यात त्यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते उमेश आपटे, माजी सरपंच रमेश ढोणूक्षे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष सदानंद व्हनबट्टे यांची भेट घेवून मैत्रीचा सेतू बांधण्यासाठी हात पुढे करत सहकार्यासाठी साकडे घातले आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल महिनाभरात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख दावेदारांनी आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कागलमधील लढत प्रतिष्ठेची 'काटे की टक्कर' अशीच आहे. महायुतीत विद्यमान आमदारांना 'तिकीट फिक्स' असल्याने गेल्या पाच वर्षांपासून विधानसभेची तयारी करणाऱ्या समरजीत घाटगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे. त्यांना शरद पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे. शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज यांची निर्णायक ताकद मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजयबाबा घाटगे यांनी आपली ताकद हसन मुश्रीफ यांच्या मागे लावण्याचे जाहीर केले असले तरी उद्धव ठाकरे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत असून उद्धव ठाकरे सांगतील तोच आमचा उमेदवार असेल असे जाहीर केले आहे.
एकूणच कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय घाटगे, समरजीत घाटगे यांच्या गटाची फिक्स मते आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गडहिंग्लज शहर, कडगाव - गिजवणे आणि उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी अधिक लक्ष दिले आहे.
उत्तूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी काँग्रेसचे उमेश आपटे यांची या मतदारसंघावर पकड आहे. १५ हजार मतदारसंख्या असलेल्या उत्तुरचे सलग दोन वेळा लोकनियुक्त सरपंचपद आपल्या गटाकडे राखण्याची किमया त्यांनी साधली आहे. रमेश ढोणुक्षे यांच्या माध्यमातून त्यांना राजर्षी शाहू आघाडीची साथ मिळत असल्याने अटीतटीच्या लढतीत ते कायमच वरचढ ठरतात. त्यामुळे राष्ट्रवादीची 'व्होट बँक' फिक्स आहे. समरजीत घाटगे यांनी भाजपची साथ सोडली असली भाजपचा बहुतांश गट त्यांच्यासोबत आहे. तरीही त्यांनी बेरजेसाठी उत्तूर भागात महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या भेटीगाठीवर जोर दिला आहे.
मुंबई, पुणेस्थित ग्रामस्थ मंडळांवर लक्ष
पहिल्या टप्यात तरी समरजीत घाटगे यांनी बेरजेच्या राजकारणात आघाडी घेतली आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्या जोडण्या कितपत यशस्वी होतात यावरच उत्तूर भागातील मताधिक्य ठरणार आहे. याचवेळी दोन्ही नेत्यांनी मुंबई, पुणे, इचलकरंजीस्थित ग्रामस्थ मंडळांची साथ मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. गणेशोत्सवात गावी आलेल्या मुंबई आणि पुणेस्थित चाकरमान्यांची बैठक घेण्याची तत्परता समरजीत घाटगे यांनी दाखवली होती. मुंबईतील सर्वात जुने मंडळ असलेल्या उत्तूर सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश दिवटे, सेक्रेटरी महादेव मिसाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
घाटगे यांचा रविवारी मुंबईत मेळावा
पुण्यातील मेळाव्याला चांगले यश मिळाल्याल्यानंतर समरजीत घाटगे यांचा रविवारी २९ सप्टेंबर रोजी मुंबईत मेळावा होणार आहे. मुंबईस्थित कागल, गडहिंग्लज, उत्तूर वासीयांच्या मेळाव्याची त्यांनी जोरदार तयारी केली आहे. डीलाईल रोड येथील श्रमिक मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

