दै. 'पुढारी' कस्तुरी, श्रद्धा योग सेंटर नेसरी यांच्या वतीने आयोजन
कोल्हापूर जिल्हा योग असोसिएशनच्या सचिव डॉ. जयश्री पाटील यांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब गडहिंग्लज, श्रद्धा योग सेंटर व गर्भसंस्कार केंद्र, नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूर जिल्हास्तरीय योग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी योग विद्या धाम गडहिंग्लज, योगा कल्चर असोसिएशन महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा योग असोसिएशनच्या सचिव डॉ. जयश्री पाटील यांनी दिली.
सकाळी ९ पासून गडहिंग्लज येथील कोड्ड कॉलनीतील योग विद्या धाममध्ये दिवसभर ही स्पर्धा होणार आहे. 6 वर्षापासून 65 वर्षांपर्यंत महिला व पुरुषांसाठी पारंपरिक, रिदमिक, आर्टिस्टिक अशा स्वतंत्र गटात स्पर्धा होणार आहे. याबरोबरच 65 वर्षांवरील खुल्या गटाच्याही स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या योगपटूंना मानाचे पदक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी ऑल इंडिया योग कल्चरल फेडरेशन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेतील पहिल्या यशस्वी विजेत्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा योग असोसिएशनच्या सचिव डॉ. जयश्री पाटील -८९५६३२६३७८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

