कारखान्याचे दूषित पाणी ओढे, नाल्यात सोडल्याने उद्भवलाय पाणी प्रदूषणाचा प्रश्न
माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिले प्रांताधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील बेरडवाडी येथील धान्यापासून अल्कोहोल निर्मिती कारखान्याचे दूषित पाणी ओढ्या नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा गुरा- ढोरांसह मोर्चा काढण्याचा इशारा हिरण्यकेशी नदी प्रदूषणमुक्त संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव- बेरडवाडी येथे मेसर्स गडहिंग्लज ॲग्रो अल्कोकेम लिमिटेड हा धान्यापासून अल्कोहोल निर्मितीचा कारखाना सुरू आहे. या कारखान्याचे दूषित पाणी भडगाव गावच्या ओढ्या नाल्यात सोडले जाते. यामुळे येथील प्रदूषित झाले आहे. परिणामी नागरिकांचे, पशु पक्षांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर याचा परिणाम शेतजमिनींवर देखील होत आहे. यापूर्वी याबाबत कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी निवेदने देऊन देखील कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी अमरसिंह चव्हाण, शिवप्रसाद तेली, राजू चौगुले, रवींद्र शेंडुरे, बाळासो कोरी, रविशंकर बंदी, महादेव घोलराखे, शंकर चोथे, बसवराज बंदी, सुभाष भोई, काशिनाथ चव्हाण, परशुराम भोई, महादेव भोई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



