आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन
खमलेहट्टी येथे बांधकाम कामगारांना भांडी संचचे वाटप
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्यातील महायुती सरकारने भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरु करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापाठोपाठच शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. असे विविध लोककल्याणकारी निर्णय घेऊन हे सरकार जनतेच्या हिताचे काम करत आहे. तसेच गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत सोळाशे कोटीची विकास कामे केली आहेत. त्यामुळे येथील जनतेने मला पुन्हा एकदा आशीर्वाद दिल्यास या मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मला बळ मिळेल असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
खमलेहट्टी (ता.गडहिंग्लज) येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांना संसारोपयोगी भांडी संच वाटप व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते.
स्वागत व प्रास्ताविक बाबुराव चौगुले यांनी केले. अरुण घुगरे यांनी विशेष परिश्रम घेऊन यापूर्वी 90 भांडी संच वाटप केले होते. आज 103 भांडी संच वाटप करण्यात आले. आजपर्यंत खमलेहटी, शिंदेवाडी, चन्नेकुपी, हणमंतवाडी, जरळी व मुगळी या गावांमध्ये भांडी संच वाटप झाले आहे. तेथे अद्यापही लाभार्थ्यांना संच वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी अरुण घुगरे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंग चव्हाण, विकी कोणकेरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अभय देसाई, पी. के. पाटील, बी. एस. पाटील, नेताजी जाधव, विकी कोणकेरी, बाबुराव चौगुले, अरुण घुगरे, संजय कोकीतकर, शंकर सुतार, राणी आरबोळे यांच्यासह पंचक्रोशीतील लाभार्थी उपस्थित होते. आभार संजय कोकितकर यांनी मानले.






