औरनाळ फाट्यावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झाला अपघात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील औरनाळ फाट्यावर कार व रिक्षाचा झालेल्या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील रिक्षा चालक सदाशिव मारुती फेगडे (वय 42) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रिक्षा चालक सदाशिव फेगडे हे गडहिंग्लज- संकेश्वर मार्गावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मुलांना सोडण्यासाठी गेले होते. मुलांना सोडून औरनाळकडून गडहिंग्लजकडे येत होते. दरम्यान, औरनाळ फाट्यावर संकेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर.....
अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेवर न आल्याने मदतीला विलंब झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. गडहिंग्लजकडून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने त्यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयात आणले. त्यांना डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे कोल्हापूरला उपचारासाठी हलविण्यात आले होते. कदाचित रुग्णवाहिका वेळेत येऊन मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

