मतदारसंघातील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भेट
शिवसैनिकांच्या कळविल्या भावना
मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतून ठाकरे शिवसेना पक्षाला मिळावी अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींकडे केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. सुनील शिंत्रे, डॉ. रियाजभाई शमनजी, प्रभाकर खांडेकर या इच्छुक उमेदवारांनी मुंबई येथे शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, आमदार भास्करराव जाधव, विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची भेट घेतली. चंदगड विधानसभा मतदारसंघात ठाकरे पक्ष शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून शिवसेनेने येथील जागा लढवावी अशी भावना सर्व शिवसैनिकांची आहे. याकडे या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून सर्व शिवसैनिकांच्या भावना कळविण्यात आल्या. चंदगड विधानसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी अजित खोत, संदीप चव्हाण, अवधूत पाटील, अशोक निकम, दिनकर जाधव, दीनानाथ चव्हाण उपस्थित होते.




