Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी, बुगडीकट्टी मार्गावर सायंकाळी साडेपाच किंवा सहा वाजता बस सुरू करण्याची मागणी

तब्बल अडीच तास विद्यार्थी, प्रवाशांना बसस्थानकावर बसावे लागते ताटकळत 


तेरणी, बुगडीकट्टीला जाणारे प्रवासी, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्रास 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी, बुगडीकट्टी मार्गावर सायंकाळी साडेपाच किंवा  सहा वाजता बेरडवाडी मार्गे एसटी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील विद्यार्थी, पालक व प्रवासी वर्गातून होत आहे.



गडहिंग्लज आगारातून सकाळपासून दुपारपर्यंत तेरणी, बुगडीकट्टी मार्गावर एका तासाच्या फरकाने एसटी बसेस आहेत. मात्र सायंकाळी साडेचार वाजताची गडहिंग्लज- बुगडीकट्टी गाडी गेल्यानंतर तेरणी, बुगडीकट्टीला जाण्यासाठी थेट सायंकाळी सात वाजताच गाडी आहे. साडेचार नंतर तब्बल अडीच तास प्रवाशांना ताटकळत बसस्थानकावर बसावे लागते. हलकर्णी पर्यंत एसटी बस आहेत मात्र याचा उपयोग तेरणी, बुगडीकट्टीला जाणाऱ्या प्रवाशांना नाही, कारण खासगी प्रवासी वाहतूकच बंद असल्याने या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना हलकर्णीत येऊन ताटकळ थांबावे लागते. गावाकडे जाणाऱ्या एखाद्या दुचाकीस्वाराला लिफ्ट मागावे लागते किंवा एखाद्या खासगी चार चाकी वाहनाला हात करावे लागते. बऱ्याचदा ही वाहने थांबतीलच असे नाही. मग नाईलाजास्तव प्रवाशी व विद्यार्थ्यांना पायपीट करत गाव गाठावे लागते.



तेरणी, बुगडीकट्टी गावच्या विद्यार्थ्यांचे हाल 


गडहिंग्लज बसस्थानकावर बुगडीकट्टी मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. हलकर्णी मार्गावर सतत गाड्या असून देखील बुगडीकट्टी गाडीलाच मोठी गर्दी होत असल्याने तेरणी, बुगडीकट्टीला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. गर्दीमुळे पुढे संत गजानन महाराज कॉलेज येथे थांबलेल्या तेरणी, बुगडीकट्टी, कवळीकट्टी येथील विद्यार्थ्यांना बऱ्याचदा सायंकाळी साडेचारच्या गाडीत चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गर्दीमुळे बऱ्याचदा ही गाडी संत गजानन महाराज महाविद्यालयाजवळ थांबेल की नाही? याची भीती विद्यार्थ्यांना असते, कारण ही साडेचारची गाडी चुकली तर सायंकाळी सातच्या गाडीची वाट पहात ताटकळत बसावे लागते. विद्यार्थी, प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन आगाराने तेरणी, बुगडीकट्टी मार्गावर सायंकाळी साडेपाच किंवा सहा वाजता एसटी बस सुरू करावी अशी जोरदार मागणी होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.