पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने 'नवसाला पावणारा गणपती'चा मान दिल्याने गणेशभक्तांमध्ये होती आगमनाची आतुरता
पारंपरिक वाद्यांचा गजर, नेत्रदीपक आतषबाजी व भक्तांच्या उत्स्फूर्त गर्दीने स्वागत मिरवणूक ठरली लक्षवेधी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीतील श्री रामलिंग गणेश मंडळाच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीची स्वागत मिरवणूक लक्षवेधी ठरली. पारंपारिक वाद्यांचा गजर, नेत्रदीपक आतषबाजी व उत्स्फूर्तपणे स्वागतासाठी लोटलेला जनसागर यामुळे यंदाची स्वागत मिरवणूक ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. खुद्द पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने श्री रामलिंग मंडळाच्या या गणेश मूर्तीला 'नवसाला पावणारा गणपती' चा मान देत मानाचा शाल दिल्याने यंदाच्या आगमनाची सर्व गणेशभक्तांना मोठी आतुरता होती.
हलकर्णी येथील श्री रामलिंग देवाच्या मंदिराजवळ गेली ५२ वर्षे होत आली श्री रामलिंग गणेश मंडळाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई पद्धतीची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मंडळाचे यंदाचे हे ५३ वे वर्ष आहे. भाविकांची असणारी श्रद्धा व त्यांना आलेला अनुभव याची दखल घेत पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने या मंडळाच्या गणेशमूर्तीची 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून मान देत मानाचा शाल देत ट्रस्टच्या दरबारी मंडळाची नोंद केली आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून मानाचा शाल मिळवणारे हे राज्यातील दुसरे मंडळ आहे.
त्यामुळे यंदा या गणेश मूर्तीच्या आगमनाची पंचक्रोशीतील गणेश भक्तांना मोठी आतुरता होती. हलकर्णीत बाप्पाचे आगमन होताच हजारो गणेश भक्तांचा जनसागर दर्शनासाठी लोटला होता. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. पारंपरिक वाद्यांचा गजर व नेत्रदीपक आतषबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने श्री रामलिंग मंडळाला दिलेला मानाचा शाल'श्रीं'ना अर्पण करण्यात आले. हा नेत्रदीपक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. श्री रामलिंग गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत मिरवणूक शांततेत पार पाडत मोठ्या उत्साहात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
चौकातील हायमास्ट दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या विकास निधीतून हलकर्णी येथील बस स्थानकानजीक असणाऱ्या चौकात हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी देखील हा परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघतो. श्री रामलिंग मंडळाच्या बाप्पांची स्वागत मिरवणूक या हायमास्ट दिव्यांमुळे महिलांसह सर्वांना लख्ख प्रकाशात ही मिरवणूक पाहता आल्याने भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला. या निमित्ताने समाधानही व्यक्त करण्यात आले





