Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पद घेऊन घरात बसू नका, सदस्य नोंदणी वाढवा !

शिवसेना उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे यांचे महिला पदाधिकाऱ्यांना आवाहन


गडहिंग्लजला ठाकरे पक्ष शिवसेनेची 'स्त्री शक्ती संवाद यात्रा'



                                छायाचित्र  : आशपाक किल्लेदार, गडहिंग्लज 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): महिलांमध्ये संघटन करण्याची फार मोठी ताकद असते. त्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ पदावरच न राहता घराबाहेर पडून जास्तीत जास्त  सदस्य नोंदणीवर भर द्यावा व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी केले.



आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथे शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात महिला शिव सर्वेक्षण अभियान अंतर्गत आयोजित स्त्री शक्ती संवाद यात्रा प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपनेत्या छायाताई शिंदे, मीरा-भाईंदरचे संपर्क संघटक रोशनीताई कोरे गायकवाड, माजी नगरसेविका संजनाताई मुणगेकर, कोल्हापूर जिल्हा महिला संपर्कप्रमुख रंजना शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी महिलांशी संवाद साधताना डॉ. ठाकरे म्हणाल्या, विधानसभा निवडणुक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या मिळवून महिला पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीवर अधिक भर द्यावा. शाखा संघटिकांनी किमान ५०, विभाग प्रमुखांनी १००, उप तालुका प्रमुखांनी १५०, तालुका संघटिकांनी ५००, उपजिल्हा संघटिकांनी १००० तर जिल्हा संघटिकांनी किमान दहा हजार याप्रमाणे महिला सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी नवीन महिला पदाधिकारी निवडी, सदस्य नोंदणी याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.



कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना महिलांचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी  लढत आलेला पक्ष आहे. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांनी आपण काम करत असलेल्या पदाला न्याय दिला पाहिजे. मोठ्या जबाबदारीने काम करत महिलांचे संघटन वाढविणे गरजेचे आहे, यासाठी जे लागेल ते सहकार्य पक्षामार्फत केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.



प्रारंभी स्वागत माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांनी केले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा संघटिका शांताताई जाधव,  रंजना आंबेकर, विद्या गिरी, सीमा गोरे, सुषमा पाटील, विमल पाटील, मेरी डिसोजा, स्नेहल पाटील, शारदा घोरपडे, मधुरा कांबळे, गीता देसाई, सुमन देसाई, मंगल जाधव, स्वरूपा पेंडूरकर यांच्यासह चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आभार स्नेहल पाटील यांनी मानले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.