प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नियमित तपासण्या करण्यात येत असल्याचे 'एक्स' या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
उद्योगपती रतन टाटा यांचा इतिहास
उद्योगपती रतन टाटा यांचा नवल आणि सूनू टाटा यांच्या पोटी २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत कॅम्पियन, कॅथेड्रल, जॉन कॉनन या ठिकाणी झाले. उच्चशिक्षण अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात झाले. याठिकाणी त्यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपण टाटा कुटुंबीयांमधील आहोत याचा त्यांना जरासुद्धा अहंकार नव्हता, कारण सर्व शिक्षण हे स्वतःच्या पायावर उभे राहूनच पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत वास्तव्यास असताना हॉटेलमध्ये भांडी घासली, कारकुनाची नोकरी केली. या कामातून मिळालेल्या पैशातून त्यांनी शिक्षण घेतले होते. अमेरिकेतील जीवनशैलीच्या प्रभावाने त्यांनी तेथे राहण्याचे ठरवले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात नवाजबाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भारतात यावे लागले. भारतात आल्यानंतर रतन टाटा यांना आयबीएम या कंपनीकडून नोकरीची संधी आली होती. मात्र जेआरडी टाटा यांनी त्यांना टाटा समूहातूनच कामाची सुरुवात करावे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी १९६२ साली टाटामधून कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच बघितले नाही. यशाची शिखरे गाठत उद्योगांचा डोलारा उभा केला. टेटली, कोरस, जग्वार लँड रोव्हर, ब्रुनर मोंड, जनरल केमिकल इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्स अशा जगभरातील नामवंत कंपन्या टाटा ग्रुपचा भाग त्यांनी बनवला. २००८ साली नॅनो गाडी बाजारात आणून सर्वसामान्यांच्या चार चाकी वाहनाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले होते.
उद्योगपती रतन टाटा यांना देश-विदेशातील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. टाइम मॅगेझनने जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत उद्योगपती रतन टाटा यांचा समावेश केला होता. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी मदतीचा हात पुढे करणारे, लाखो लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारे 'देवमाणूस' म्हणून ओळख असलेल्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने आज संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.


