Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पैशाचा योग्य विनियोग करून आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम व्हा!

गडहिंग्लज उपविभागाचे डाक निरीक्षक गणेश चाटे यांचे आवाहन 


तेरणी येथील डाक मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


विक्रमी संख्येने महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामीण विभागात आर्थिक साक्षरता  व सक्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने शासन पोस्ट विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी पैशाचा योग्य विनियोग करावा व आर्थिक संकटांवर मात करावे असे आवाहन गडहिंग्लज उपविभागाचे डाक निरीक्षक गणेश चाटे यांनी केले.




गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथे आयोजित डाक मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बसवेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संजय जोशी, उपसरपंच सौ. सोनव्वा कतिगार, बाळासाहेब निंबाळकर, शिक्षक रमजान अंकली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच करवीर उथळे होते. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




यावेळी विक्रमी संख्येने महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज, हलकर्णी, मनवाड, बसर्गे, हसुरसासगिरी, कडलगे, बुगडीकट्टी, नरेवाडी, कवळीकट्टी, नंदनवाड, येणेचवंडी, नौकुड येथील डाक कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत मदत केले. 


यावेळी बोलताना डाक निरीक्षक श्री. चाटे पुढे म्हणाले, शासन स्तरावरून  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसह विविध योजना राबवून ग्रामीण भागातील जनतेमध्ये आर्थिक साक्षरता व सक्षमता निर्माण व्हावी हा शासनाचा चांगला उद्देश आहे. त्यामुळे अशा विविध योजना अंतर्गत मिळणाऱ्या पैशांचे पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवून त्याचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील आर्थिक संकटे भागविण्यास मदत होवू शकते. वैद्यकीय, मुलांचे शिक्षण, विवाह यासह विविध कारणांसाठी हा पैसा मदतीला येऊ शकतो. पोस्टामध्ये महिन्याला शंभर रुपयांपासून बचत सुरु करता येते असे सांगून त्यांनी सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, अपघाती विमा योजना यासह विविध योजनांची माहिती महिलांना दिली.




सरपंच करवीर उथळे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, ग्रामपंचायतीकडून तेरणी येथील पोस्ट कार्यालयाला सर्वतोपरी सहकार्य आम्ही केले आहे ते यापुढे देखील सदैव राहील. भविष्यात पोस्ट कार्यालयाला कायमस्वरूपी इमारत उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगून पोस्ट विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.




बसवेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संजय जोशी यांनी तेरणी पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत ग्रामस्थांनी सहकार्य करत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व त्या पैशांचा योग्य विनियोग करावा असे आवाहन केले.



प्रारंभी स्वागत शिक्षक रमजान अंकली यांनी तर प्रास्ताविक तेरणी पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर करवीर नावलगी यांनी केले. 



कार्यक्रमास उपसरपंच सौ. सोनव्वा कतिगार, बाळासाहेब निंबाळकर, गडहिंग्लज पोस्ट कार्यालयाचे अधिकारी मारुती येसणे, आवेक्षक सुशांत पाटील, मनवाड पोस्ट मास्तर भरमा कलगोंडा, हलकर्णीचे राजेंद्र उत्तुरे, बसर्गेचे गोविंद भुईंबर, हसुरसासगिरीचे सिमरन नदाफ, प्रवीण आळवणे, कडलगेचे प्राची चौगुले, बुगडीकट्टीचे बसवानी रामाज, नरेवाडीचे राजेंद्र चुंगडी, सौरभ पोवार, कवळीकट्टीचे देवयानी कोले, येणेचवंडीचे राजेश लोंढे, नौकुडचे जोतिबा मांगले, तेरणीचे साक्षी चव्हाण, साक्षी लवटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. आभार सुशांत पाटील यांनी मानले. डाक मेळाव्याचे नियोजन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तेरणीचे पोस्ट मास्तर करवीर नावलगी, कु. साक्षी चव्हाण यांनी केले. 












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.