नवरात्रोत्सवानिमित्त शहरातून सुवासिनींची कलश मिरवणूक
श्री महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना, ओटी भरणे कार्यक्रम
छायाचित्र : मज्जीद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवानिमित्त गडहिंग्लजला श्रीदेवी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शहरात सुवासिनींची कलश मिरवणूक पार पडली. घटस्थापनेने दसरा महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी दसरा महोत्सव साजरा केला जातो. आज सकाळी सात वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर हिरण्यकेशी नदी घाटापासून सुवासिनींची कलश मिरवणूक काढण्यात आली. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. त्यानंतर ओटी भरणे कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दिनांक ४ व ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व विकास केंद्र, महिला सेवेकऱ्यांच्या वतीने दुर्गा सप्तशती पाठ घेण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक ११ रोजी दुपारी तीन वाजता युनिव्हर्सल फ्रेंड्स सर्कल व श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टतर्फे कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला आहे. बुधवार दिनांक १६ रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री बारा वाजता देवीला दुग्धाभिषेक व त्यानंतर दुग्धपान कार्यक्रम होणार आहे. १७ ऑक्टोबरला नवान्न पौर्णिमेनिमित्त सकाळी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सर्व भाविकांना श्री महालक्ष्मी देवीचे सुलभ दर्शन होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.







