Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोड साखर'ला मिळालेल्या कर्जांच्या विनियोगाची माहिती सार्वजनिक करा !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नूतन चेअरमन प्रकाशभाई पताडे यांना निवेदन 


चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत विविध बाबींकडे त्यांचे वेधले लक्ष 


यापुढे कारखान्याचा कारभार पारदर्शक होईल अशी व्यक्त केली अपेक्षा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल प्रकाशभाई पताडे यांचे अभिनंदन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इथून पुढे कारखान्याचा कारभार पारदर्शी व सुरळीतपणे सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त करत यापूर्वीच्या व सध्याच्या कर्जाच्या विनियोगाबाबत स्पष्टता आणावी, याबाबतची माहिती सार्वजनिक करून सर्व सभासदांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी सभासद, ऊस तोडणी वाहतुकदार व कामगार यांच्या वतीने नूतन चेअरमन श्री. पताडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.




या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. प्रकाश शहापूरकर हे कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी के.डी.सी.सी. बँकेकडून ५५ कोटीचे कर्ज घेतलेले होते, त्या कर्जाचा विनियोग कसा काय केला? सदरचे कर्ज घेवून त्यांनी कोणत्या प्रकारची मशिनरी बसविली? देखभाल दुरुस्तीवर एकुण खर्च किती झाला? ओढणी-तोडणीवर एकुण खर्च किती झाला? या संदर्भात असलेली संपूर्ण माहिती सार्वजनिक करुन प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचवावी, तुम्ही चेअरमन होण्यापूर्वी पूर्वहंगामी कर्ज चालू गळीत हंगामासाठी के.डी.सी.सी. बँकेकडून कारखान्यास ४९ कोटी रुपयांचे कर्ज मंजुर झाल्याचे समजुन येते. त्या कर्जाच्या पैशाचा विनियोग कोणकोणत्या कारणासाठी करणार आहात? आपण तोडणी-ओढणीसाठी किती रक्कमेची तरतुद त्यामध्ये करणार आहात? देखभाल व दुरुस्तीसाठी किती रक्कमेची तरतुद करणार आहात? याची संपूर्ण माहिती गोड साखरच्या सर्व सभासदांना द्यावी, कारखान्याची आजची परिस्थिती काय आहे? म्हणजेच एकुण देणी-येणी किती आहेत, कोण-कोणाच्या किती किती रक्कमा देणी आहेत, आजी व माजी कामगारांची किती देणी कारखान्याने द्यावयाची आहेत याबाबत सविस्तर श्वेतपत्रिका काढुन सर्व सभासदांपर्यंत पोहाचवून आपण पारदर्शी व्यवहार करुन कारखान्याचे पुनरुज्जीवन आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात व्हावे यासाठी तुम्ही व तुमचे सर्व संचालक मंडळ अतिशय काटकसर करुन कारखाना चालवून कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन द्यावे, 




कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये उच्च प्रतीचा मुबलक ऊस उपलब्ध असून ऊस तोडणीबाबत तालुक्यामध्ये स्थानिक तोडणी मजूर (जवळ-जवळ ६० ते ७० टक्के) उपलब्ध आहेत, तसेच वाहतुकदार सुध्दा सहजरित्या उपलब्ध आहेत. या यंत्रणेचा परीपूर्ण उपयोग करुन त्यांना विश्वासात घेवुन जास्तीत जास्त ऊस आपल्या साखर कारखान्याकडे कसा येईल याचा गांभिर्याने विचार करुन विभागवार बैठका घेऊन ऊस उत्पादक शेतकरी, वहातुकदार, तोडणी-ओढणी मजूर इत्यादी सर्व घटकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, जेणेकरुन हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने व अपेक्षित गाळप पूर्ण शकेल व गळीत हंगाम यशस्वी होईल, कारखान्यास आवश्कतेनुसारच दैनंदिनी मजुरांना घ्यावे. कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता अतिशय काटकसरीने व चोखंदळपणे व्यवहार करणे गरजेचे आहे. आदी बाबींकडे या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. 



निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, दिलीप बेळगुद्री, धनाजी पाटील, ॲड. आप्पासाहेब जाधव, मल्लिकार्जुन चौडाज, बसवराज मत्नाळे, मल्लाप्पा अमाते, राजकुमार पाटील आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.