येणेचवंडी येथे ज्ञानदीप वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणादिन व निबंध-स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनीधी) : वाचनालये ही ज्ञानमंदिरे आहेत, योग्य आहार व्यायामामुळे शरीर तंदुरूस्त राहते तसे वाचन हे बुद्धीचे खाद्य असून प्रगल्भ वाचनाने आपल्या बुद्धीची व मनाची मशागत होते.असे मत महागाव येथील म. फुले ज्युनियर कॉलेजचे प्रा. पी.डी.पाटील यांनी व्यक्त केले.
येणेचवंडी (ता.गडहिंग्लज) येथील ज्ञानदीप वाचनालय आयोजित वाचन प्रेरणादिन व निबंध-स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एस. टी. कुराडे अध्यक्षस्थानी होते. शिवराय हायस्कूल नंदनवाड येथे हा कार्यक्रम पार पडला.
नीळकंठ कुराडे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विनायक पोवार व महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रशिक्षण परिषदेच्या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी गणित विषयासाठी बनवलेल्या चित्रफितीस जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल अनिल गोणी भातपिक स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्यात प्रथम क्रमांकआल्याबद्दल माजी सरपंच संभाजीराव कुराडे यांचा सत्कार करण्यात आला.
वाचन-प्रेरणा दिनानिमित्य घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेच्या यशस्वी स्पर्धकांना वाचनालयाच्या वतीने प्रमाणपत्र व रोख पारितोषिके तसेच वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल संचित फडके, श्रेया बिरंजे, श्रावणी कुराडे यांना एन. डी. कुराडे विचारमंच मार्फत रोख बक्षीसे देवून गौरवण्यात आले. यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, सरपंच दिपाली कांबळे, शिवराय हायस्कूल नंदनवाडचे मुख्याध्यापक राजेश चव्हाण, विनायक पोवार, एस. टी कुराडे, वाचनालयाचे सेक्रेटरी प्रकाश इंगळे यांची भाषणे झाली. संजय बिरंजे यांनी सूत्रसंचालन तर दशरथ राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यामंदिर येणेचवंडीचे मुख्याध्यापक उत्तम यमगेकर, उपसरपंच जयश्री भोसले, अरूणा कुराडे,विजय इंगळे, श्रीकांत मांगले, दिलीप पाटील, सोमशेखर हिरेमठ, प्रकाश जोडगुद्री, अशोक शिंदे,अमित नंद्यानावर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



