गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी प्रकाशभाई पताडे यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत ही निवड झाली.
साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे अध्यक्ष पद निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे यांची देखील नावे चर्चेत होती. दरम्यान, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करत सर्वांच्या संमतीने अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ संचालक प्रकाशभाई पताडे यांच्या नावाला पसंती दिली. निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना नूतन चेअरमन प्रकाशभाई पताडे म्हणाले, आमचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर विश्वास दाखवून साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे सोपविली आहे. साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक करून मी निश्चितच त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या हंगामात साडेचार लाख टन उसाचे गाळप करण्यात येईल, त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, निवृत्त कामगार यांचे प्रश्न सोडविले जातील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, हेमंत कोलेकर यांच्यासह सर्व संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

