गडहिंग्लज तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट क्रिकेट स्पर्धा
दोन्ही गटात मुलांना विजेतेपद
सर्वोदय व सौ. वि. दि.शिंदे हायस्कूलला उपविजेतेपद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पार्वती हायस्कूल औरनाळ व एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत जागृती हायस्कूलने दुहेरी यश मिळविले. १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुलांच्या गटाने विजेतेपद मिळविले. मुलांच्या दोन्ही संघाची कोडोली (तालुका पन्हाळा) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेचे उदघाटन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक डी.जी. डिवटे, श्रीरंग तांबे, सौ.सुनीता पाटील, विनायक नाईक, रावसाहेब शिंत्रे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख मदन दांडगीदास यांनी तर आभार नाना सुतार यांनी मानले.
14 वर्षाखालील गटात सात संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात जागृती हायस्कूलने न्यू होरायझनला 19 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सर्वोदयने छत्रपती शिवाजी विद्यालयाचा आठ गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्यात जागृतीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. जागृतीच्या प्रीतम दिवटेच्या १६ चेंडूत २८ धावाच्या आक्रमक फलंदाजीने सहा षटकात दोन बाद ४७धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सर्वोदयने सहा षटकात आठ खेळाडूंच्या मोबदल्यात २४ धावा करता आल्या. जागृतीने २३ धावांनी सामना जिंकून अजिंक्यपद मिळविले. जागृतीच्या हार्दिक विरंबोळे याला सामनावीर तर प्रीतम दिवटेला मालिकावीर बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
१७ वर्षाखालील गटामध्ये आठ संघानी सहभाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात सौ. वि. दि.शिंदे हायस्कूलने केदारी रेडेकरचा २२ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागृती हायस्कूलने परिश्रम विद्यालय दुंडगे या संघावर१५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना जागृती आणि सौ. वि. दि. शिंदे हायस्कुल यांच्यात अतिशय चुरशीचा झाला. नाणेफेक जिंकून सो विधी शिंदेने फलंदाजी स्वीकारले शुभम राजगिरी याच्या आक्रमक फलंदाजीने नऊ चेंडूत वीस धावांची आक्रमक खेळी केली. अजिंक्य मांडे याने नऊ धावांची उपयुक्त खेळी केली.जागृतीला सहा षटकात 36 धावांचे आव्हान दिले. प्रस्तुतरादाखल खेळताना जागृतीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला सुरुवात केली. अखेर दोन चेंडू बाकी असताना सात खेळाडूंच्या मोबदल्यात ३६ धावा करून रोमहर्षक विजय मिळविला. जागृती कडून समर्थ निकम, नैतिक तेलवेकर, प्रज्वल पन्हाळकर, संदेश सुतार व सुरज खमलेटी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सामनावीर प्रज्वल पन्हाळकर तर मालिकावीर शुभम राजगिरे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून महादेव चिलमी, संपत सावंत, मदन दंडगीदास, नाना सुतार, जगदीश गावित यांनी काम पाहिले.




