मुंबई : काल हेलिकॉप्टर मधून सभेसाठी जाताना यवतमाळ मधील वणीमध्ये हेलीपॅडवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी शेअर केल्याने याची जोरदार चर्चा झाली होती. यावरून राज्यातील राजकारण तापले होते. दरम्यान, आज पुन्हा औसामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याने याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॅगा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच उलटतपासणी केली. त्यांनी त्यांचं नाव, नियुक्त पत्र, त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा केली. आतापर्यंत किती जणांना तपासलं आहे, हे देखील विचारले. याबाबत अधिकाऱ्यांनी तुम्हीच पहिले आहात असे सांगितले. त्यावर, “मीच पहिला गिऱ्हाईक आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी मिश्किलपणे केला. ते म्हणाले, आज मोदी सोलापुरात येत आहेत. ओदिशात त्यांची बॅग तपासली म्हणून अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं होतं. त्यामुळे माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, ही माझी जाहीरसभेतील आजची मागणी आहे. मला जो न्याय लागतो, तो मोदींनाही लागला पाहिजे.” बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवंतर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन या, असंही ते बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणाले. यामुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

