24178 चे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय
राजेश पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर महाविकास आघाडीच्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते
छायाचित्र : अशपाक किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघात रंगलेल्या पंचरंगी लढतीत अखेर भाजपचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत बलाढ्य उमेदवारांना मोठा धक्का दिला. मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत रिंगणातील दिग्गज उमेदवारांना त्यांनी पिछाडीवर टाकले. त्यांना एकूण 83653 इतकी मते त्यांना मिळाली. 24178 इतके मताधिक्य त्यांना मिळाले. गडहिंग्लज येथील नगरपरिषदेच्या पॅवेलियन हॉलमध्ये ही मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेत शेळके, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
चंदगड विधानसभा मतदारसंघात पाचही बलाढ्य उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या ठिकाणी नेमके कोण बाजी मारणार अशी चर्चा होती. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. मात्र या सगळ्याला फाटा देत भाजपाचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे सर्वांचे अंदाज फोल ठरवत शिवाभाऊने बलाढ्य उमेदवारांना धक्का दिला. चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून डॉ. नंदाताई बाभूळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्यचे मानसिंग खोराटे रिंगणात होते. चंदगडला मोठ्याप्रमाणात जोरदार चुरस वाढली होती. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आजरा तालुक्यातील कोळींद्रे जि. प. मतदारसंघाची मोजणी सुरु झाली. या मतदार संघातून राजेश पाटील यांना अधिक मताधिक्य मिळेल, त्यांच्या पाठोपाठ नंदाताई बाभूळकर राहतील आणि या ठिकाणी शिवाजी पाटील हे चौथ्या क्रमांकावर राहतील असाच कयास बांधला होता. मात्र शिवाजी पाटील यांना पहिल्यांदा याच मतदार संघातून वाढीव मताधिक्य मिळाले. यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. या ठिकाणी सुरु झालेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कमी झालीच नाही. उलट फेऱ्या जसजश्या वाढत गेल्या तस तसे शिवाजी पाटील यांचे मताधिक्य वाढत गेले. प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतली. फक्त ७ व्या फेरीमध्ये मताधिक्य घटले. त्यानंतर शिवाजी पाटील यांनी मागे वळून बघितले नाही. फक्त ७ व्या फेरीमध्ये मताधिक्य घटले.
शिवाजीराव पाटील यांनी अखेरच्या २८ व्या फेरी अखेर शिवाजी पाटील यानी २४१७८ अशी आघाडी घेत ८३६५३ मते तर विद्यमान आमदार राजेश पाटील यांना ५९४७५ तर महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर यांनी ४६४८७ मते, अपक्ष अप्पी पाटील यांनी 24410, मानसिंग खोराटे यांनी 22020 इतकी मते घेतली. शिवाजीराव पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्ते व समर्थकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर व केंद्रामध्ये पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घराणेशाही विरोधातील रोष जनतेने दाखवून दिला : आमदार शिवाजीराव पाटील
विजयानंतर प्रतिक्रिया देताना नूतन आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, चंदगड मतदारसंघातील जनतेने या निकालाच्या माध्यमातून घराणेशाही विरोधातील रोष दाखवून दिला आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा व्हिजन घेवून मी निवडणूक लढवीली आहे. याची वचनपूर्ती करणे हाच माझा यापुढे संकल्प आहे. येथील सर्व घटकांच्या पाठबळामुळे मला हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.
यावेळी धनशक्तीचा जनशक्तीवर विजय झाला : राजेश पाटील यांची प्रतिक्रिया
निवडणूक निकालानंतर माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, गेल्या वेळी जनशक्तीचा धनशक्तीचा विजय झाला होता. यावेळी मात्र धनशक्तीचा जनशक्तीवर विजय झाला आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांना मिळालेली मते -
शिवाजीराव पाटील - 83653, टपाली मतदान 601
राजेश पाटील- 59485, टपाली मतदान 645
डॉ. नंदाताई बाभुळकर- 46487, टपाली मतदान 772
विनायक उर्फ अप्पी पाटील- 24410, टपाली मतदान 172
मानसिंगराव खोराटे- 22020, टपाली मतदान 87
श्रीकांत कांबळे - 920, टपाली मतदान 23
अर्जुन दूंडगेकर- 1467, टपाली मतदान 17
परशराम कुट्रे-577, टपाली मतदान 15
अशोक अर्दाळकर-1275, टपाली मतदान 1
अक्षय डवरी-456, टपाली मतदान 1
जावेद अंकली -285, टपाली मतदान 0
तुलसीदास जोशी-300, टपाली मतदान 3
समीर नदाफ-260, टपाली मतदान 4
प्रकाश रेडेकर -1259, टपाली मतदान 10
मोहन पाटील -622, टपाली मतदान 4
रमेश कुट्रे- 577, टपाली मतदान 1
संतोष चौगुले-310, टपाली मतदान 2
नोटा -966




