Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धाकधूक वाढली, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

चंदगड मतदारसंघातील वाढलेल्या मतांचा कौल कुणाला, सर्वांना लागली हुरहूर 


उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष ; उत्सुकता शिगेला 





गडहिंग्लज (संतोष नाईक): चंदगड विधानसभा मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीत म्हणजेच 2019 ला 68.64 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 6 टक्क्यांनी वाढली असून 75 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेल्या या मताचा टक्का कोणाचे बाजूने कौल दिला आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणी उद्या दिनांक 23 रोजी होणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला असून सर्वांना हुरहूर लागली आहे. पाच उमेदवारांमधील चुरस पाहता आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.



चंदगड विधानसभा मतदारसंघात यंदा अपक्ष उमेदवार, महायुती व महाविकास या दोन्ही आघाड्यांमधील बंडखोरांमुळे तब्बल 17 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. असे असले तरी खरा सामना दिग्गज पाच उमेदवारांमध्येच रंगला. यामध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ नंदाताई बाभुळकर, भाजपचे नेते अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार उद्योजक मानसिंगराव खोराटे यांचा समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक ही मोठ्या चुरशीने व इर्षेने झाल्याचे दिसले. रिंगणातील या पाच दिग्गजानी आपण कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक रिंगणात आहोत हे सांगत जोरदार प्रचार केला. 



महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी मतदार संघात केलेली विकास कामे, महायुती सरकारने महिलांसाठी राबविलेली लाडकी बहीण योजना या आधारावर प्रचार केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ नंदाताई बाभुळकर यांनी त्यांचे वडील माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे, त्यांच्या निधनानंतर आईसाहेब  माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या म्हणून स्वतः डॉ. बाभुळकर या मायलेकींनी मतदारसंघातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवरील जनतेशी संपर्क ठेवून केलेली विकास कामे, चंदगड तालुक्यातील प्रदूषणकारी एव्हीएच सारखा प्रदूषणकारी प्रकल्प हद्दपार करण्यासाठी दिलेला लढा, महायुती सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेकारी, महिलांची असुरक्षितता आदी मुद्द्यांवर भर देत प्रचार केला. अपक्ष उमेदवार व भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी आपल्याकडे कोणतेही पद नसताना चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी केलेली कोट्यवधीची विकास कामे, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेच्या मदतीला जाऊन दिलेला दिलासा, आगामी काळात मतदारसंघात सुसज्ज आरोग्यसेवा व बेरोजगारांच्या हाताला काम हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेले. अपक्ष उमेदवार विनायक उर्फे अप्पी पाटील यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडी स्थापन करत एक सर्वसामान्य चेहरा म्हणून ही निवडणूक लढवली. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उद्योजक मानसिंगराव खोराटे यांनी चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढून उत्कृष्टरित्या चालविला. भविष्यात या मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम हा प्रमुख संकल्प या मुद्द्यावर त्यांनी प्रचार यंत्रणा राबविली.



गत निवडणुकीचा विचार करता विद्यमान आमदार राजेश पाटील हे 5 हजार 55  मतांनी विजयी झाले होते. तर सध्या रिंगणात असणारे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची तर अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आमदारकीपर्यंत कोण पोहोचणार, कोणाला कितव्या क्रमांकाची मते मिळणार हे पहावे लागणार आहे. या पाचही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचे रान उठवले होते. मतदानानंतर प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्ते व समर्थकांनी आपल्या नेत्याचा विजय कसा सुकर झाला आहे, याची आकडेमोड करताना दिसले. मात्र मतदारांचा नेमका कौल कोणाला ? हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.