यंत्रणा सज्ज ; चार वाजेपर्यंत निकाल शक्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदार संघातील मतमोजणी उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथील गांधीनगर मध्ये असणाऱ्या नगरपरिषदेच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये होत आहे. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एकूण 14 टेबलांवर 28 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेत शेळके, राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
पहिल्या हॉलमध्ये 14 टेबलांवर ईव्हीएम मशीनवरील मतांची तर व्यायाम शाळेच्या हॉलमध्ये 10 टेबलांवर पोस्टल आणि आठ टेबलांवर कर्तव्यावरील सैनिकांच्या मतांची मोजणी होणार आहे. एका फेरीत 14 केंद्रामधील मतांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येथील असे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी कर्नाटक राज्य राखीव दल, आयटीबीपी फोर्स व महाराष्ट्र पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टल तर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम मशीन वरील मतमोजणी होणार आहे. ईव्हीएम वरील मते 2 लाख 45 हजार 387, पोस्टल मते 2000 ते 2100, सैनिक मतदार 2111 ( प्रत्यक्ष प्राप्त 230) इतकी आहेत.
चंदगड मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत अपक्षांसह एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर, भाजपचे नेते व अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील, अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे उद्योजक मानसिंगराव खोराटे यांच्यामध्ये पंचरंगी लढत झाली.

