१७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद
मतदारांच्या मनातील आमदार कोण ? याचे उत्तर आता २३ तारखेलाच मिळणार
छायाचित्र : अशपाक किल्लेदार, गडहिंग्लज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी ३९० मतदान केंद्रांवर मोठ्या चुरशीने शांततेत एकूण ७४.८९ टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघातून तब्बल १७ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण दहा मतदारसंघात चंदगडमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक रंगतदार झाली. रिंगणातील प्रत्येक दिग्गज उमेदवारांनी जनतेचा कौल आम्हालाच असल्याचा दावा मतदानानंतर केला आहे. त्यामुळे मतदाराच्या मनात कोण आमदार दडला आहे? याचे उत्तर २३ तारखेलाच मिळणार आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते, मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर, महायुतीचे उमेदवार राजेश पाटील, भाजपचे नेते अपक्ष शिवाजी पाटील, अपक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील, जनसुराज्यचे मानसिंग खोराटे यांच्यामध्ये झाली.
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील मतदान केंद्राचे कामकाज महिलांनी तर चंदगड तालुक्यातील अडकूर येथील मतदान केंद्राचे कामकाज दिव्यांग कर्मचाऱ्यांनी पाहिले. चंदगड व दूंडगे येथील दोन आदर्श मतदान केंद्रे लक्षवेधी ठरली. मतदारसंघातील १९५ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आले होते.
विविध मतदान केंद्रे ठरली लक्षवेधी
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक भागातील वैशिष्ट्यांवर आधारित मतदान केंद्रीय उभारली होती. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी येथे हवामान बदल, जागतिक समस्या,
बड्याचीवाडी येथे ग्रीन व्हिलेज, हलकर्णी येथे जलसंवर्धन, हरळी खुर्द येथे जैवविविधता संवर्धन काळाची गरज, नूल येथे संगणक, टीव्ही, मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम,
आजरा तालुक्यातील हत्तीवडे येथे कबड्डीपटूंचे गाव, वाटंगी येथे पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, किटवडे येथे महाराष्ट्राची चेरापुंजी, दाभिल येथे जी आय मानांकन प्राप्त तांदूळ घनसाळ या संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रांची उभारणी करून मतदारांची जनजागृती करण्यात आली. हे सर्व केंद्रे लक्षवेधी ठरली.









