Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड मतदार संघातील जनतेचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी नंदाताईंना संधी द्या!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेसरीतील प्रचार सभेत आवाहन 


...तर त्यांनी तुपुरवाडी कोठे आहे ? हे सांगावे : डॉ. नंदाताई बाभुळकर 


                                 छायाचित्र : अशपाक किल्लेदार, गडहिंग्लज 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपल्याला भविष्य असावे आणि इतिहास असला तर चांगला असावा. चांगला इतिहास असला तर तो सांगता येतो. न सांगणारा इतिहास असणारा आमदार झाला तर चंदगड विधानसभा मतदारसंघाची ओळख महाराष्ट्राला काय होईल? याचा गांभीर्याने विचार करा. या मतदारसंघात लोकशाही टिकवण्यासाठी की लोकशाही संपवून गुंडाराज सुरू करायचा? हा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे चंदगड मतदारसंघातील जनतेचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर बाभुळकर यांना विधानसभेवर जाण्याची संधी द्यावी असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेसरीतील सभेत केले. या सभेत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. 




गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे चंदगड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर -बाभुळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.




यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष  श्री. पाटील पुढे म्हणाले, काहीजण चंदगड मतदारसंघात १६०० कोटी रुपयांची विकास कामे झाल्याचा केवळ डांगोरा पिटत आहेत. प्रत्यक्षात मात्र काही झालेच नाही. या निवडणुकीत गद्दारांशी आपली स्पर्धा नाही कारण हे गद्दार आता फारच मागे गेले असून  त्यांचा पराभव अटळ आहे. त्यामुळे या गद्दारांना गाडण्याचा निर्धार नेसरीच्या या भूमीतूनच करणे योग्य ठरेल, असे आवाहन त्यांनी केले. 'खोके' संस्कृतीमुळे राज्यात पहिल्यांदाच लोकांना कळालं की राजकारणाचा धंदा झाला आहे. त्यामुळे आता हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचा राहिलेला नाही. भाजप देखील अटलबिहारी वाजपेयी यांचा राहिलेला नाही. त्यामुळे त्या अपप्रवृत्तीना महाराष्ट्रात शिरू न देण्याची काळजी जनतेने घेतली पाहिजे. आज बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न देखील घसरले असून तिसऱ्या क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य आता अकराव्या क्रमांकाला गेले आहे. याउलट नवव्या स्थानी असणारा गुजरात मात्र  आता पाचव्या क्रमांकावर आहे, कारण महाराष्ट्रातले अनेक मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याचा हा परिणाम आहे, असे सांगून जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. चंदगड विधानसभा मतदारसंघात जनतेचा आवाज टिकवण्यासाठी, गुंडगिरी,  कॉन्ट्रॅक्टरांची एक खिडकी योजना परंपरा मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.



...तर त्यांनी तुपुरवाडी कोठे आहे हे सांगावे : डॉ. नंदाताई बाभुळकर 




महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर बाभुळकर म्हणाल्या, चंदगड तालुक्यात काही जणांची दादागिरी सुरू आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांना पत्रक काढून त्यांना संपविण्याची भाषा ते करत आहेत. चंदगड मतदारसंघामध्ये अवैध धंदे वाढत आहेत. तरुण पिढी यामध्ये गुरफटत आहे. हे सगळं थांबविण्याची आता गरज आहे. माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची लेक म्हणून मी तुमच्याकडे मते मागत नाही. स्वर्गीय बाबांच्या निधनानंतर आईसाहेब श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड विधानसभेचे नेतृत्व केलं. बाबांनी पाहिलेलं मतदार संघाच्या विकासाचा स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विकासाचा ध्यास घेऊन या मतदारसंघातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर आम्ही माय-लेकी फिरलोय. सर्व घटकांचे प्रश्न, समस्या समजावून घेतले आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गावांशी मी संपर्क ठेवला आहे. आजही डोळे मिटून मला नकाशावर बोट ठेवण्यास सांगितलं तर मी नक्की सांगेन खळणेकरवाडी कुठे आहे, मळवीवाडी कुठे आहे, किंवा हडलगेचा लमानवाडा कोठे आहे. किंवा आजऱ्यातला मोरेवाडीचा धनगरवाडा कोठे आहे. कारण गेल्या सात वर्षात प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन पोचलोय. त्यामुळे चंदगड मधील सर्व उमेदवारांना माझं जाहीर आव्हान असेल की, आमचं तुपुरवाडी कुठे आहे? ते त्यांनी सांगावं, तर नक्कीच गडहिंग्लजकर तुमच्या पाठीशी उभे राहतील, असे आव्हान देखील त्यांनी विरोधकांना दिले. यापुढे मतदारसंघातील जनतेच्या सर्व समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपले कायमस्वरूपी मतदारसंघातच वास्तव असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. काहीजण आपण 1600 कोटी रुपयांचा विकास केला आहे असे सांगत आहेत. मग विकास कोठे गेला,  गेल्या पाच वर्षात विधानसभेत मतदार संघातील प्रश्नांवर तुम्ही किती वेळ बोललात? असा सवाल देखील त्यांनी केला. त्या मंडळींना भेटण्यासाठी जाणाऱ्यांना एक नुलचा व दुसरा अडकुरचा टोलनाका ओलांडावा लागतो अशी उपरोधिक टीका देखील नंदाताईनी विरोधकांवर केली. चंदगडची संस्कृती टिकवण्यासाठी  व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेवर संधी देण्याची साद नंदाताईंनी जनतेला घातली. 




या जाहीर प्रचार सभेला माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, बेळगावचे माजी आमदार दिगंबर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, तालुकाप्रमुख दिलीपराव माने, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवाजीराव खोत, रामराजे कुपेकर, शिवाजी माने, संभाजीराव देसाई, रोहित पाटील, नंदकुमार गोरुले, दशरथ कुपेकर, शिवाजीराव सावंत, प्रकाश पाटील, वैशाली पाटील, नारायण वाईंगडे, अशोक पाटील, आप्पा नाईक, दयानंद बोरगल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.